कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे दिसते आहे. सुनील ग्रोवर थेट कपिलच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविणार असल्याचे समजते. विमान प्रवासात सुनील ग्रोवरला अवमानकारक बोलल्याबद्दल कपिलने माफी मागितली असली तरी ती घटना सुनीलच्या चांगलीच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच त्याने आता कपिलसोबत यापूढे काम न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. सुनील ग्रोवरच्या जवळच्या मित्राने ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील ग्रोवर यापुढे कपिलसोबत काम करणार नसल्याचे सांगितले. या संकेतस्थळाशी बोलताना सुनीलचा मित्र म्हणाला की, सुनील ग्रोवरने सोनी टिव्हीसोबत २३ एप्रिलपर्यंत करार केला आहे. हा करार संपल्यानंतर सुनील पुन्हा कपिलसोबत काम करण्यास इच्छुक नाही. सुनील ग्रोवरच्या मानधनामध्ये वाढ केली तरी तो काम करण्यास तयार होणार नाही. सोनी टिव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

काही दिवसांपूर्वी कपिल आणि सुनील यांच्यात विमानप्रवासादरम्यान झालेल्या वादामुळे कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यात दरी निर्माण होणार असल्याच्या चर्चा रंगली. एवढेच नाही तर सुनील ग्रोवर कपिल शर्माचा कार्यक्रम सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर कपिलने फेसबुकवरून सुनील ग्रोवरची माफी मागत सारे काही सुरळीत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता सुनीलच्या मित्राने दिलेल्या माहितीमुळे कपिलच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेतच मिळत आहेत.