कॉमेडियन सुनील ग्रोवरने आता नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनीलने त्याच्या शोला रामराम ठोकला. त्यानंतर सर्वांना खळखळून हसवणारा सुनील नेमका कोणत्या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार याबद्दल अनेक तर्क लावण्यात येत होते. अखेर सुनील क्रिकेट सामन्याची कॉमेन्ट्री करत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दिलेला शब्द पाळत सुनीलने हा नवा प्रवास सुरु केला आहे. आपल्या कारकिर्दीतील या नव्या वळणावर त्याला साथ दिली आहे ती म्हणजे सनी लिओनीने. गुरुवारी पार पडलेल्या आयपीएलच्या सामन्याची कॉमेन्ट्री करण्याची धुरा सुनीलने सांभाळली होती. कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यादरम्यान खेळवल्या गेलेल्या सामन्याची कॉमेन्ट्री या दोघांनी केली. एका न्यूज अॅपसाठी सनी आणि सुनीलने हे एकत्र आले आहेत.

सुनीलचा विनोदी अंदाज आणि सनीची अदा यांमुळे अनेकांनाच ही कॉमेन्ट्री भावली. याचेच काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. धमाल, मजा करत सनी-सुनीलने केलेली ही कॉमेन्ट्री आणि त्यांनी केलेला गिद्धा पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर हसून येत आहे.

दरम्यान, कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवरने त्याची ही नवी इनिंग सुरु केली आहे. सुनीलने या कार्यक्रमातून काढता पाय घेतल्यानंतर सोशल मीडियावरही याचे पडसाद पाहायला मिळाले होते. बऱ्याचजणांनी याप्रकरणी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यामुळे या वादाला नवनवीन वळणं मिळत गेल्याचे पाहायला मिळाले होते.