कॉमेडी शोजच्या वेगवेगळ्या संकल्पना सध्या टीव्हीवरच्या विविध वाहिन्यांवर धुमाकूळ घालतायेत. ‘स्टँड अप’ कॉमेडियन्सचे शो आधी लोकप्रिय झाले. त्यानंतर कॉमेडी रिअ‍ॅलिटी शोज आले. त्यांनीही टीआरपीच्या शर्यतीत स्वत:ला पुढे ठेवलं. कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ने या शोजच्या लोकप्रियतेची सगळी समीकरणे बदलून टाकली. त्याला टक्कर देण्यासाठी कृष्णा अभिषेकचा ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ हा शो ‘कलर्स’ वाहिनीवरच सुरू झाला तेव्हा कपिल शर्माने वाहिनीला सोडचिठ्ठी दिली आणि त्याने ‘सोनी टीव्ही’वर नव्याने आपला ‘द कपिल शर्मा शो’ उभा केला. दुर्दैवाने, कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हर वादाचे ग्रहण या शोला लागले. आता पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. एकाच वाहिनीवर दोन-तीन कॉमेडी शोज सुरू होतायेत. प्रसिद्ध विनोदी अभिनेत्यांची रस्सीखेच सुरू आहे. कॉमेडी शोजची टीआरपीसाठी चाललेली अजब कसरत सध्या सगळ्याच वाहिन्यांवर पाहायला मिळते आहे.

‘द कपिल शर्मा शो’ हा आजवरचा सगळ्यात लोकप्रिय कॉमेडी शो मानला जातो. टीआरपीच्या स्पर्धेत कायम पहिल्या पाचात असणारा हा शो सध्या बदनामीच्या-अपयशाच्या गर्तेत सापडला आहे. सध्या हा शो टीआरपीच्या यादीत चौदाव्या क्रमांकावर आहे. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे या शोचा कर्ताधर्ता कपिल शर्मा आणि त्याचा एके काळचा मुख्य सहकारी सुनील ग्रोव्हर यांच्यातील वाद. सुनील ग्रोव्हर, अली असगर आणि चंदन प्रभाकर या ‘द कपिल शर्मा शो’मधील हे तिन्ही कलाकार त्यातून बाहेर पडले. चंदन प्रभाकर पुन्हा शोत परतला; पण अली असगर आणि सुनील ग्रोव्हर ज्यांनी या शोमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली ते काही परतले नाहीत. शोचा टीआरपी गडगडला आणि कपिल शर्माला नव्याने जुळवाजुळव करावी लागली. दरम्यान, २०१३ मध्ये ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’सारखा शो त्याच वाहिनीवर आणत शत्रुत्व निर्माण करणाऱ्या कृष्णा अभिषेकचा हा शो या वर्षी जानेवारीत संपला. त्यामुळे तोपर्यंत या शोमधून नावारूपाला आलेल्या भारती सिंगची मदत घेऊन कपिल शर्माने आपल्या शोचे तारू टिकवले खरे..

पण आता पुन्हा एकदा कॉमेडी शोजची लाट सगळ्या वाहिन्यांवर पसरली आहे. या शोजची लोकप्रियता इतक्या झपाटय़ाने वाढणारी आहे की, मराठी असो वा हिंदी हे शो त्या वाहिनींसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांच्यासाठी या शोजची लोकप्रियता हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. मराठीतही ‘झी मराठी’वरच्या ‘चला हवा येऊ द्या’चे प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सध्या हिंदीतील सगळ्या आघाडीच्या कलाकारांसाठी चित्रपट प्रसिद्धीचे ते मोठे व्यासपीठ ठरतेय. एकदा शोची लोकप्रियता वाढली की, शोसंबंधित अनेक छोटय़ा-मोठय़ा घडामोडी शोसाठी कधी तारक, तर कधी मारक ठरतात. ‘कलर्स मराठी’ वाहिनीची ओळख असलेला ‘कॉमेडीची एक्स्प्रेस’ गेली अनेक वर्षे हा शो टिकू न आहे. आता ‘कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस’ हा शो ‘कलर्स मराठी’वर सुरू झाला आहे. या शोजची मागणी वाढली आहे तशी हे शो टिकवण्यासाठी सतत नवनवीन कल्पना राबवणं, टीआरपी धरून ठेवणंही गरजेचं होऊन बसलं आहे. सोनी टीव्हीसाठी ‘द कपिल शर्मा शो’ असाच प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. मात्र शो गडबडतोय हे लक्षात आल्यानंतर तो बंद करण्याऐवजी वाहिनीने पुन्हा कृष्णा अभिषेक आणि टीमला हाताशी धरून ‘द ड्रामा कंपनी’ हा शो सुरू केला आहे. यात कपिलच्या टीममधून बाहेर पडलेल्या अली असगरबरोबर ‘सैराट’ फे म तानाजी गोलगुंडे, डॉ. संकेत भोसले, सुगंधा मिश्रा आणि खुद्द मिथुन चक्रवर्ती अशी मोठी टीम उभी केली आहे. त्यामुळे साहजिकच आधीच गडगडलेल्या कपिलच्या शोला याचाही चांगलाच हादरा बसला आहे. भारती सिंग आणि

राजू श्रीवास्तवच्या मदतीने कपिलने पुन्हा  एकदा शो उभा केला होता. मात्र भारतीचीही लोकप्रियता वाढली असल्याने ती ‘अँड टीव्ही’वरच्या नव्या ‘कॉमेडी दंगल’ या शोत थेट परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याच कारणाने तिने कपिलचा शो सोडला आहे.

आतापर्यंत या कॉमेडी शोजच्या लोकप्रियतेचीच चर्चा होत होती. त्यांचा चांगला टीआरपी ही एकमेव गोष्ट प्रेक्षकांना दिसत होती; पण आता शोसमोर असलेली टीआरपीची स्पर्धा किती जीवघेणी आहे याची चर्चा कपिलच्याच शोमुळे सुरू झाली आहे. कपिलबरोबर पहिल्या शोपासून कायम असलेल्या अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने पहिल्यांदाच या टीआरपीच्या दबावाबद्दल जाहीर वाच्यता केली आहे. कपिलवर शोचा टीआरपी वाढवण्याचा दबाव आहे. मात्र त्याची प्रकृती चांगली नसल्याने त्याला कित्येकदा शोचे चित्रीकरण करणेही शक्य होत नाही आहे. अशा वेळी कपिलबरोबर राहून शो टिकवताना सुमोना, किकू शारदासारख्या कलाकारांची एकच तारांबळ उडाली आहे. ‘द कपिल शर्मा शो’ टीआरपी नसल्याने बंद होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. सुमानाने तसे काही नसल्याचे स्पष्ट केले असले तरी शो पुढे कसा न्यायचा, याचा ताण कपिलसह सगळ्यांवरच असल्याचेही तिने मान्य केले आहे. एखादा जॉनर लोकप्रिय झाला की त्याच धाटणीच्या शोचे एकच पीक आपल्याकडे येते. जो प्रकार सध्या कॉमेडी शोजच्या बाबतीत सुरू आहे. विनोदी मालिका, शोज, रिअ‍ॅलिटी शोज अशा सगळ्या प्रकारच्या कॉमेडी शोजची बहार वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरू आहे. मराठीत अजून तरी गळेकापू स्पर्धा नाही, पण हिंदीत मात्र टीआरपीच्या या गणितामुळे एक प्रकारे ‘कॉमेडी’चे युद्ध सुरू झाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.