ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांचे मत
माझ्या कारकिर्दीचा प्रारंभ कलात्मक चित्रपटांनी झाला. असे चित्रपट करताना विचार नसलेला चित्रपट कसा करतात ते तरी पाहू असे म्हणून व्यावसायिक चित्रपट केले तर तेच अधिक विचारी चित्रपट आहेत याची जाणीव झाली, असे मत ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लबतर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात घई बोलत होते. घई यांनी मुक्ता आर्ट्स निर्मित २३ चित्रपटांच्या प्रती जतन करण्यासाठी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केल्या. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संयोजक रवी गुप्ता, आशयचे सचिव वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) ही माझी मातृसंस्था आहे. संस्थेमध्ये शिक्षण घेताना विद्यार्थीदेखील स्वत: शिकत असतो. आपली प्रेरणा आणि शक्ती आपल्याला शिकवत असते. मी विद्यार्थी नव्हतो असा एकही क्षण नव्हता. आजही मी विद्यार्थीच आहे. चित्रपटाचे आयुष्य एक-दोन वर्षेच असते.
संग्रहालयामुळे चित्रपटांना दीर्घायुष्य लाभले याचे समाधान वाटते, असेही सुभाष घई यांनी सांगितले.