मदुराई येथील एका वकिलाने तामिळ अभिनेता विजयच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मर्सल’ सिनेमातील विजयच्या संवांदांवरुन त्याने ही तक्रार दाखल केली आहे. ‘अभिनेता विजयविरोधात तक्रार आली असून त्याच्यावर अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही,’ असे मदुराईतील अण्णानगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

‘मर्सल’ सिनेमात विजय एका गावाचा प्रमुख दाखवण्यात आला आहे. तो स्वतः एक डॉक्टर आणि जादूगारही असतो. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत असला तरी या सिनेमाला भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामनाही करावा लागत आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव एच. राजा आणि तामिळनाडुचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तमिलीसाई सुंदरराजन यांनी सिनेमात जीएसटी आणि डिजिटल इंडियावर टीका करण्यात आल्याने आक्षेप घेतला आहे. अन्य भाजप नेत्यांनीही या दृश्यावर आक्षेप नोंदवला आहे.

सुंदरराजन यांनी सोमवारी ट्विट करत आपले विचार मांडले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे एखाद्याचे चुकीचे विचार खोडून काढण्याचेही स्वातंत्र्य असते. तर दुसरीकडे राजा यांनी आपल्या ट्विटमध्ये विजय हा ख्रिश्चनधर्मीय असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. २१ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या जोसेफ विजय याच्या ‘मर्सल’ सिनेमात मोदींविरोधात द्वेष दिसून येतो असे त्यांनी म्हटलेय.

त्यांनी विजयचे मतदान ओळखपत्र आणि त्याने लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले. यात तो ख्रिश्चन असल्याचे दोन पुरावे सादर केले. हे दोन्ही फोटो ट्विटरवर टाकत सत्य नेहमीच कटू असतं, असे कॅप्शनही दिले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेल्या विजयने नोटाबंदीचे समर्थनही केले होते.