‘बीएमसीवर भरवसा नाय का?’ असं म्हणून मुंबई महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या आरजे मलिष्का आणि महापालिका-शिवसेनेच्या वादात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. राणे यांनी मलिष्कावर ‘भरवसा’ दाखवत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मलिष्का तू एकटी नाही…आम्ही आहोत तुझ्याबरोबर…वाघोबा करतो म्याव म्याव…आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!’ असं ट्विटरास्त्र सोडून शिवसेनेला घायाळ करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना मलिष्कावर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत

आरजे मलिष्का हे नाव तसं नवीन नाही. ‘मुंबई तुझा बीएमसीवर भरवसा नाय का?’ या विडंबनात्मक गाण्यानं ती आता तर घराघरात पोहोचली आहे. महापालिकेचे वाभाडे काढणाऱ्या मलिष्काचीच सध्या सगळीकडं जोरदार चर्चा आहे. मुंबई पालिकेच्या कारभाराची पोलखोल तिनं ‘सोनू साँग’च्या माध्यमातून केली होती. शिवसेनेला ही बोचरी टीका रुचली नाही. नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि काही शिवसैनिकांनी तिला याच गाण्याचा आधार घेत जशास तसं उत्तर दिलं होतं. तसंच मलिष्कावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारीही शिवसेनेनं केली आहे.

मलिष्काच्या ‘सोनू साँग’ला किशोरी पेडणेकरांकडून शिवसेना स्टाईल उत्तर

त्यात मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्यामुळं पालिकेनं तिला नोटीसही बजावली आहे. त्यामुळं आता तिच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. पण महापालिकेची ‘बिनधास्त’ खरडपट्टी काढणाऱ्या मलिष्काला काँग्रेस आमदार राणे यांनी ‘भक्कम’ पाठिंबा दिला आहे. राणे यांनी ट्विट करून आपण मलिष्काच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत, असं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर मलिष्का आणि आम्ही बहिण-भाऊ असल्याचं नितेश यांनी म्हटलं आहे. मलिष्काला पाठिंबा देतानाच राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. ‘वाघोबा करतो म्याव म्याव’ अशी खोचक टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. आता राणेंच्या टीकेला शिवसेना कोणत्या शब्दांत उत्तर देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बीएमसीवर भरोसा नाय का? विचारणाऱ्या मलिष्काच्या घरात सापडल्या डेंग्यूच्या अळ्या