सचिन तेंडुलकरचे असंख्य चाहते आहेत ही काही नवीन बाब नाही. पण, यापैकी मोजक्या चाहत्यानांच सचिनला भेटण्याची संधी मिळते. मात्र, खुद्द ‘मास्टर ब्लास्टर’नेच स्वत:हून एखाद्या चाहत्याला भेटण्याचे कबूल केले तर? आता हे ऐकून तुम्हाला ‘पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा’ या ओवीची आठवण येईल. मात्र, सचिनच्या एका चाहत्याला खरोखरच असा अनुभव आला आहे.

त्याने ट्विटर अकाऊंटवरुन ‘केबीसी’ म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती ९’ या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत सचिनने ट्विटमध्ये लिहिलंय, ‘तुम्ही खूप छान खेळलात राजुदास राठोड. तुम्ही दिलेली माहिती ऐकूनही खूप मजा आली…. आपण लवकरच भेटू.’ आता केबीसीच्या ‘हॉट सीट’वर बसलेल्या राजुदास आणि सचिनचं नेमकं काय कनेक्शन असाच प्रश्न तुमच्याही मनात घर करतोय ना?

बिग बी अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामध्ये राजुदासला ‘हॉट सीट’वर बसण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी बिग बी ज्याप्रकारे त्या प्रश्नाच्या उत्तराची उकल करत होते, ते पाहता राजुदासला सचिनविषयी एखादा प्रश्न विचारला होता असं दिसतंय. कारण बिग बींचं बोलणं झाल्यानंतर राजुदासनेही याविषयी त्याचं मत मांडलं. ‘क्रिकेट या खेळाविषयी माहिती मिळाल्यापासून म्हणजेच १९९६ पासून मी हा खेळ पाहतोय. तेव्हापासूनच मी त्याचा (सचिन) चाहता आहे. त्याच्या एका शतकाचा आनंद मी दोन- तीन दिवस साजरा करायचो. ९९ धावांवर जेव्हा तो बाद व्हायचा तेव्हा माझीची निराशा व्हायची. सचिन खेळपट्टीवर येण्यापूर्वीच एक तास आधीपासून मी टीव्हीसमोर येऊन बसायचो, देवाकडे प्रार्थना करायचो. मला सचिनच्या खेळण्यामुळे बराच आनंद झाला. किंबहुना जितकं दु:ख झालं तेसुद्धा सचिनमुळेच झालं, असंही राजुदास म्हणाला. अर्थात हे तो विनोदी अंदाजात म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानंतर ‘केबीसी’च्या मंचावरही एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

एका सर्वसामान्य चाहत्याच्या मनात नेमक्या काय भावना असतात आणि तो कशा प्रकारे व्यक्त होतो याचाच प्रत्यय राजुदासकडे पाहून येत होता. राजुदासचं हे प्रेम आणि आपल्याला भेटण्याची त्याची इच्छा पाहता खुद्द सचिननेच त्याला भेटण्याचं आश्वासन दिलं आहे. तेव्हा आता ‘मास्टर ब्लास्टर’ला भेटण्याचं त्याचं स्वप्न साकार होण्याच्या वाटेवर आहे असंच म्हणावं लागेल. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धकांना काही आर्थिक लाभ होतो. पण, खरंच छोटीछोटी स्वप्नंही याच कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होतात असं म्हणायला हरकत नाही.