काही गायक असे असतात ज्यांचं कोणतंही गाणं रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी पुरेसं असतं. सध्याच्या घडीला अरिजित सिंग हा एक असा गायक आहे, ज्याचं कोणतंही गाणं कानसेनांना तृप्त करतं. गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होणारे भाव आणि वेगळ्याच दुनियेत नेणारा त्याचा आवाज म्हणजे एक वेगळंच समीकरण. या समीकरणाचे म्हणजेच अरिजितचे असंख्य चाहते आहेत यात वादच नाही. त्याच्या असंख्य चाहत्यांमध्ये एक असंही नाव आहे जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसेल. कारण अरिजितचा हा चाहतासुद्धा एक सेलिब्रिटी आहे. त्या चाहत्याचं नाव आहे, विराट कोहली. बसला ना आश्चर्याचा धक्का? खुद्द विराटनेच त्याची ही ‘फॅनबॉय मुमेंट’ सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत शेअर केली आहे.

हा फोटो शेअर करत विराटने त्यासोबत दिलेलं कॅप्शन म्हणजे एक चाहता म्हणून अरिजित प्रती त्याचं प्रेम व्यक्त होत आहे. या फोटोमध्ये अरिजित आणि विराटच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. एखादा चाहता त्याच्या सर्वात जास्त आवडत्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ज्या आनंदलहरी पाहायला मिळतात, अगदी तसाच आनंद विराटच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BaVvhzXAJyz/

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

विराट सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. विविध कार्यक्रमांपासून ते क्रिकेट सामन्याच्या सरावापर्यंत बऱ्याच गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ तो पोस्ट करत असतो. त्यामुळे चाहत्यांशी त्याचं नातं आणखीनच दृढ झालं आहे. फक्त क्रीडा विश्वातच नाही तर बॉलिवूड वर्तुळातही तो तितक्याच सहजतेने वावरतो. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने अष्टपैलू सेलिब्रिटी ठरत आहे असं म्हणायला हरकत नाही.