भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सध्या सोशल माध्यमातून फटकेबाजी करुन चांगलीच लोकप्रियता मिळवत आहे. क्रिकेटच्या मैदानानंतर समालोचनामध्ये दिसणारा सेहवाग ‘वीरु के फंडे’ या वेब सीरिजमध्ये सूत्रसंचालन करत आहे. यापार्श्वभूमीवर आयएनएस या वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेहवागने बॉलिवूड आणि क्रिकेट यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. क्रिकेट आणि बॉलिवूड ही दोन्ही क्षेत्रे वेगवेगळी असून ती एकमेकांवर अवलंबून नसल्याचे तो यावेळी म्हणाला. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसतात. बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खान तर आयपीएलमधील संघ विकत घेऊन क्रिकेटशी जोडला गेल्याचे दिसते. हे चित्र बॉलिवूड आणि क्रिकेट एकमेकांवर अवलंबून असल्याचे चित्र निर्माण करणारे असे आहे. पण सेहवागला असे मुळीच वाटत नाही. बॉलिवूडमध्ये अधिक पैसा असल्यामुळे ही मंडळी क्रिकेटचे संघ खरेदी करत असल्याचे वीरुने म्हटले आहे. क्रिकेट आणि बॉलिवूड वेगवेगळे असून क्रिकेटमधील खेळाडू बॉलिवू़डवर अवलंबून नसल्याचे तो म्हणाला. तसेच बॉलिवूडही क्रिकेटवर अलंबून नसल्याचे म्हटले आहे.

क्रिकेटनंतर मनोरंजनाच्या दुनियेत दाखल झालेला नवज्योतसिंग सिद्धू तसेच श्रीशांत, युवराज सिंग, हरबजन सिंग आणि इरफान पठाण यांच्या मनोरंजनातील दुनियेतील वावरण्याविषयी देखील त्याला विचारण्यात आले होते. यावर सेहवाग म्हणाला की, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा एक विशेष चाहता वर्ग असतो. त्यामुळे टीआरपीसाठी त्यांना टीव्ही तसेच अन्य कार्यक्रमात संधी मिळते. यावेळी बॉलिवूड हे क्रिकेट खेळाडूंसाठी दुसरा क्रिकेटच्या मैदानाबाहेर गेल्यानंतरचा पर्याय नाही असे देखील सांगितले.  वीरेंद्र सेहवाग सध्या ‘व्ही यू’ क्लिप व्हिडिओच्या माध्यमातून ‘वीरु के फंडे’ या सीरिजद्वारे आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. फेसबुक आणि ट्विटर या सोशल माध्यमातून मनोरंजन केल्यानंतर स्ट्रेमिंगची निवड ही व्यावसायित नसल्याचे देखील यावेळी सेहवागने स्पष्ट केले.’वीरु के फंडे’ या कार्यक्रमातून मी माझ्या सहकाऱ्यांशी गप्पा मारत आहे. यामध्ये मला माझे अनुभव सहकाऱ्यांना शेअर करायचे आहेत. कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व क्रिकेटर्स आहेत. माझ्या क्रिकेटमधील अनुभवामुळे मी त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकतो, असा विश्वासही सेहवागन यावेळी व्यक्त केला.