प्रसिद्ध दिग्दर्शक कसिनधुनी विश्वनाथ यांना चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सुवर्णकमळ, दहा लाख रुपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कसिनधुनी हे दादासाहेब फाळके पुरस्काराचे ४८ वे मानकरी आहेत. ‘संकरभारनम’, ‘सागरा संगमम’, ‘स्वाती मत्यम’, ‘संजोग’, ‘सप्तपदी’, ‘कामचोर’ आणि ‘जाग उठा इन्सान’ या चित्रपटासांठी कसिनधुनी विशेष करून नावाजले जातात.

यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने ८७ वर्षीय के विश्वनाथ यांचे नाव सूचित केले होते. माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी के विश्वनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मे महिन्याच्या ३ तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवनात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर के विश्वनाथ यांनी आनंद व्यक्त करत म्हटले की, तुम्ही शिस्तपूर्वक आणि बांधिलकीने जे काही काम कराल त्याची पोचपावती तुम्हाला मिळतेच. मग ते चित्रपट असो वा इतर कोणतही काम असो. माझ्या कामावर निर्मात्यांनी कधीच आक्षेप घेतला नाही त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी कधीच माझ्या कामात अडथळा आणला नाही.

के विश्वनाथ यांनी कमल हसन यांच्यासोबत केलेल्या ‘स्वाती मत्यम’ या चित्रपटाला ५९व्या अकॅडमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट विभागात अधिकृत नामांकन मिळाले होते. ‘स्वाती मत्यम’वर ‘ईश्वर’ हा हिंदी रिमेक आला होता. त्यात अनिल कपूरने काम केले होते.