‘दंगल’ स्टार झायरा वसिम सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. पण यावेळी तिने क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्यावर पलटवार केला आहे.
झाले असे की, १६ वर्षीय अभिनेत्री झायरा वसिमला क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये टॅग केले होते. या ट्विटमध्ये एका पेन्टिगच्या समोर विजय गोयल उभे आहेत. या पेन्टिगमधल्या मुलीने बुरखा घातलेला दिसतो. सदर फोटो ट्विट करत गोयल यांनी झायराला त्यामध्ये टॅग केले होते. या ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले की, ‘हे पेन्टीग झायरा वसिमसारखीच गोष्ट सांगत आहे. पिंजरा तोडून आमच्या मुली पुढे जात आहेत. ‘ पण झायराला मात्र या ट्विटमध्ये तिला टॅग केलेले फारसे आवडले नाही असेच दिसते.

तिने या ट्विटला उत्तर देताना गोयल यांना सर असे संबोधून म्हटले की, ‘सर मी तुमचा आदर करते, पण मी तुमच्या या ट्विटचे समर्थन करत नाही. त्यामुळे या ट्विटशी मला जोडू नका. हिजाबमध्ये असणाऱ्या महिला या तेवढ्याच सुंदर आणि मुक्त आहेत. याशिवाय या पेन्टिंगमध्ये जी गोष्ट सांगण्यात आली आहे, ती माझ्याशी निगडीत नाही.’

मुळ जम्मू आणि काश्मिरची असलेली झायरा काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना भेटली होती. मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून माफी मागणारी एक पोस्ट झायराने शेअर केली होती. या भेटीनंतर झायराची सोशल मीडीयावर खिल्ली उडवली जात होती. त्यानंतर झायराने एक खुला माफीनामा सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, काही वेळाने झायराने तो माफीनामा सोशल मीडियावरुन काढूनही टाकला होता. झायराने जाहिरपणे असा माफीनामा शेअर केल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले होते.

आमिरसोबतच अनुपम खेर आणि जावेद अख्तर या ज्येष्ठ कलाकारांनीही झायराला ट्विटरवरुन पाठिंबा दिला आहे. ‘झायरा तुझा माफीनामा ही एक दु:खदायक बाब आहे. पण, त्यासाठी फार धैर्य लागतं. तुला असे करण्यासाठी ज्या भ्याड लोकांनी प्रवृत्त केले आहे त्यांच्यावरुन आता पडदा उठला आहे. पण, तरीही तू माझी आदर्श आहेस’, असे ट्विट अनुपम खेर यांनी केले होते.