नितेश तिवारी हे नाव ‘चिल्लर पार्टी’मुळे दिग्दर्शक म्हणून घराघरात पोहोचलं. ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ने त्यांचं दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमधलं bal08स्थान पक्कं केलं आणि सध्या बॉलीवूड या दिग्दर्शकाची ‘दंगल’ अनुभवायला सज्ज झालं आहे. पण ‘दंगल’च्या मागची कथा सांगताना मी
मुळात जबरदस्तीने दिग्दर्शक झालो, असं त्यांनी स्पष्ट केलं. आता चार चित्रपटांनंतर दिग्दर्शक म्हणून विचार पक्के झाले असले तरी सुरुवातच मुळात सर्जनशील लेखनातून झाली असल्याने जाहिरात-चित्रपट या दोन्ही माध्यमांमध्ये वावरताना सर्जनशीलता जास्त महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘दंगल’ या चित्रपटाबद्दल बरंच बोललं जातं आहे, लिहिलं जातं आहे. आमिर खान यांनी महावीर फोगट यांच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत, गीता आणि बबिता कुमारी यांच्या भूमिकेसाठी चित्रपटातील चार अभिनेत्रींनी घेतलेली मेहनतही लोकांपर्यंत सध्या पोहोचते आहे. त्यामुळे या सगळ्याला फाटा देत ‘दंगल’ त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली, या विषयापासून त्यांनी गप्पांना सुरुवात केली. पैलवान महावीर फोगट यांच्यावर चरित्रपट बनवावा ही मुळातच ‘यूटीव्ही’ची कल्पना होती. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन या दोन्हीसाठी यूटीव्हीकडून आपल्याला विचारणा झाली. त्यांनी जेव्हा महावीरजींविषयी चार ओळींत गोष्ट सांगितली तेव्हा कुठे तरी हा विषय सविस्तर समजून घ्यायला हवा. लोकांना तो पाहायला नक्की आवडेल याची जाणीव झाली आणि मग थेट कामालाच सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

*  ‘दंगल’मध्ये आमिर खानचा प्रवेश नेमका कसा झाला?

दिग्दर्शक म्हणून आमिर खानबरोबर काम करायला मिळावं ही इच्छा होती. मात्र ‘दंगल’ची कथा लिहिताना ती कोणत्याही कलाकाराला समोर ठेवून लिहायची नाही, हे डोक्यात पक्कं  होतं. तसं केलं तर तुमच्या कथेवर त्या कलाकाराचा प्रभाव पडतो. त्यामुळे आम्ही आधी प्रामाणिकपणे कथा लिहून काढली. त्यासाठी आम्ही महावीरजी आणि त्यांच्या पत्नीला जाऊन भेटलो. पटियालात जाऊन गीता-बबिता यांना भेटलो. तेव्हा या गोष्टीच्या दोन्ही गमतीशीर बाजू आमच्या हाताला लागल्या होत्या. त्यानंतर मग त्यांचे प्रशिक्षक, अन्य सहकारी यांच्याबरोबरच्या गप्पांमधून एक खरोखरच चांगली कथा आकाराला आली. त्यानंतर ‘यूटीव्ही’कडून जेव्हा महावीर फोगट कोण, असा प्रश्न विचारला तेव्हा आमिर खान हे एकच उत्तर मी दिलं आणि अर्थात कोणीच नकार देऊ शकणार नाही असं हे उत्तर होतं.

*  दिग्दर्शनाची जबरदस्ती कशामुळे झाली?

मी नाखुषीने दिग्दर्शनाकडे वळलो असं सांगतोय हे गमतीचं वाटेल पण मी दिग्दर्शक बनेन, असा कधीही विचार केला नव्हता. मी आणि विकास बेहलने जेव्हा ‘चिल्लर पार्टी’ लिहिलं तेव्हाही आमची तयारी नव्हती. मी ‘लिओ बर्नेट’ या जाहिरात एजन्सीमध्ये काम करत होतो. तर तो ‘स्पॉटबॉय’मध्ये काम करत होता. आम्ही कथा लिहून काढली आणि नंतर दिग्दर्शक शोधत बसलो. पण एक कुत्रा आणि दहा मुलांची कथा.. एकही स्टार नाही. कोण करणार असा चित्रपट? खूप विचार के ल्यानंतर आम्ही ठरवलं की ही कथा पडून राहिली तर ते प्रयत्न फु कट जाणार. मग चित्रपट करून तो प्रयत्न खराब झाला तरी चालेल.. असा विचार करून मी दिग्दर्शनाचा निर्णय घेतला. आणि ती या क्षेत्रात आणणारी सुवर्णसंधी ठरली.

* ‘दंगल’साठी सिनेमॅटिक लिबर्टी घेणं गरजेचं वाटलं?

कोणताही चरित्रपट करायचा असेल तर सिनेमॅटिक लिबर्टी महत्त्वाची असते, कारण असं कुठलंच चरित्र नाही जे सर्वागाने सुंदर आहे आणि त्यातून एक व्यावसायिक चित्रपट सहज उभा राहील. जे घडलं आहे तेच अगदी दाखवायचं ठरलं तर तो मग अनुबोधपट ठरेल. त्यामुळे ‘दंगल’साठी मी ते स्वातंत्र्य घेतलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘दंगल’ची कथा लिहितानाच मी ती थोडीशी विनोदी स्टाईलने लिहिली आहे. कारण कुठे तरी असे चित्रपट करताना ते खूप गंभीर होऊ शकतात, याचा अनुभव आहे. शिवाय चित्रपटात एक सामाजिक संदेशही आहेच. त्यामुळे तो प्रवचनाच्या पातळीवर जाऊ नये आणि प्रेक्षकांचा रसभंग होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेऊन कथा लिहिली आहे. शेवटी गोष्ट तीच दाखवायची असते. त्यामुळे मूळ गोष्टीला धक्का न लावता प्रसंग बदल असतील, काही काल्पनिक व्यक्तिरेखांचा समावेश असेल, असं स्वातंत्र्य या चित्रपटासाठी घेतलं आहे.

*  ‘सुलतान’ आणि ‘दंगल’ वेगवेगळे असतील यासाठी तुम्ही खास प्रयत्न केले होते?

‘दंगल’ची सुरुवात केली तेव्हा आम्हाला ‘सुलतान’ ही याच विषयावर आहे याची कल्पना नव्हती. पण हे दोन्ही चित्रपट एकसारखे असू नयेत यासाठी खरं तर ‘सुलतान’चा दिग्दर्शक अली अब्बास जफरने पुढाकार घेतला होता. त्याने समोरून भेटायला बोलावलं. चित्रपट येण्याआधी कधीच त्याच्याविषयी चर्चा केली जात नाही. मात्र अलीने कुठलीही गोष्ट हातची न राखता चर्चा केली. आणि सुरुवातीच्या चर्चेतच या दोन्ही चित्रपटांमधला पैलवानी हा विषय सोडला तर कथा-मांडणी दोन्हींबाबतीत पूर्ण वेगळे आहेत, हे आम्हाला लक्षात आलं होतं. पण या प्रयत्नाचं श्रेय शंभर टक्के अलीचं आहे.

*  महावीर फोगट यांच्या विचारांचा नेमका काय प्रभाव तुमच्यावर पडला?

महावीर फोगट हे असं व्यक्तिमत्त्व आहे ज्याने समाज काय म्हणेल, याचा विचार न करता जे योग्य आहे ते करण्यासाठी पुढाकार घेतला. २००० सालचं हरयाणा हे काही प्रगत शहर म्हणता येणार नाही. तिथे राहून आपल्या मुलींना अशा एका खेळात प्रवीण बनवायचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणलं जिथे पुरुषांची मक्तेदारी आहे. मुलींना शिकवायला महिला प्रशिक्षक नाहीत. त्यांची गाठ पुरुष स्पर्धकांशी, थेट शारीरिकरीत्या त्या पुरुषांना भिडणार होत्या. तरीही कुठेही न डगमगता त्यांनी हे प्रत्यक्षात आणलं. त्यांचं ध्येय एकच होतं ते म्हणजे देशाला कुस्तीत सुवर्णपदक मिळवून द्यायचं आणि त्यांनी ते पूर्ण केलं. त्यांचं आयुष्य म्हणजे एखाद्या खुल्या पुस्तकासारखंच आहे. पण ‘दंगल’ पाहिल्यानंतर तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, त्यांचा संघर्ष-विचार याबद्दलच्या नवीन गोष्टी कळतील हे विश्वासाने सांगू शकतो.

* आमिर खानच्या ‘परफेक्शनिस्टपणा’चा दिग्दर्शक म्हणून त्रास झाला का?

परफे क्शनिस्ट असणं ही आमिर खानची कमजोरी नाही. उलट तो आग्रह महत्त्वाचा आहे. आमिर खूप मुरलेला कलाकार आहे. त्यांना पक्कं माहिती आहे की कुठे रेष आखायची आहे. कुठल्याही पॉइंटला त्यांना आपलं मत द्यावंसं वाटलं तर ते देतात पण ते आग्रह धरत नाहीत. ते दिग्दर्शकाचा खूप आदर करतात, त्याचबरोबर लेखकालाही ते खूप सन्मान देतात. मी पटकथा लिहिली तेव्हाच खूप खूश होतो, पण तरीही आमिरने एका क्षणात होकार देणं मला अपेक्षित नव्हतं. यातून त्यांना कथा, त्यातल्या व्यक्तिरेखा,  विचार किती अचूकपणे कळतो आहे आणि आपले विचार त्यांना पटले आहेत या जाणिवेने जास्त आनंद झाला होता.