गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूडमध्ये आपले पाय रोवू पाहणारी दीपिका बॉलिवूडची सगळ्यात महागडी अभिनेत्री ठरली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमासाठी दीपिकाने १२ कोटींपर्यंत मानधन घेतल्याच्या चर्चा सिनेवर्तुळात तर सुरुच आहेत. आता तर जगातल्या महागड्या अभिनेत्रींमध्येही तिच्या नावाची नोंद झाली आहे. ‘फोर्ब्स’ मासिकाने मंगळवारी दिलेल्या यादीमध्ये जगात सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोन १० व्या स्थानावर आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या आघाडीच्या या १० अभिनेत्रींमध्ये फक्त दीपिका पदुकोनचंच नाव आहे. अनेक काळापासून प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये चांगले काम करत असूनसुद्धा तिचे नाव मात्र या यादीत नाही. प्रियांका चोप्रा सध्या ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या पर्वाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘क्वांटिको’च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय ती हॉलिवूडच्या ‘बेवॉच’ या सिनेमातही दिसणार आहे.
‘फोर्ब्स’च्या या यादीमध्ये हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सला २०१६ मध्ये जगातली सगळ्यात महागड्या अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. लॉरेन्स सलग दोन वर्ष या यादीत प्रथम स्थानी आहे. ‘हंगर गेम्स’ या सिनेमाच्या पर्वांसाठी प्रसिद्ध असलेली लॉरेंसची या वर्षाची कमाई ४.६ कोटी डॉलर एवढी आहे. २०१५ पेक्षा यावर्षी ११.५ टक्क्यांनी ही रक्कम कमीच झाली आहे. तिचा आगामी सिनेमा ‘पैसेंजर्स’साठी सगळ्यात जास्त मानधन मिळणार असल्याची चर्चा आहे.
महागड्या अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या स्थानी मकार्थी आहे. जिची वर्षाची कमाई ३.३ कोटी डॉलर एवढी आहे. तर ‘कॅप्टन अमेरिकाः सिविल वॉर्स वण्डर वूमन’ स्कार्लेट जोहान्सन २.५ कोटी डॉलर्स एवढी आहे. ती तिसऱ्या स्थानावर असून २०१५ च्या मानाने २०१६ मध्ये तिच्या मानधनात ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
या सगळ्या अभिनेत्रींच्यामध्ये ‘ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज’ या सिनेमातून हॉलिवूडमध्ये पदापर्ण करणारी दीपिका १० व्या स्थानी आहे. तिची या वर्षाची कमाई १ कोटी डॉलर एवढी असून, या महागड्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये ती एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. या यादीच आकडे १ जून २०१५ ते १ जून २०१६ च्या मधले आहेत.