बाॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता सुशांत सिग राजपूत आणि क्रिती सेनॉनच्या आगामी ‘राबता’ चित्रपटातील शीर्षक गीतामुळे दीपिका सध्या चर्चेत आहे. दिनेश विजन दिग्दर्शित ‘राबता’ या चित्रपटातील पहिल्या वहिल्या गाण्यात दीपिकाची अदाकारी पाहायला मिळाली. ‘राबता’ चित्रपटातील छोट्याशा भूमिकेबद्दल दिनेश विजनचे आभार मानले. तिने ट्विटरच्या माध्यमातून आभार व्यक्त करताना त्याच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. दीपिकाने ट्विटमध्ये लिहिलय की, आम्ही दोघांनी ‘लव आज कल’ या चित्रपटातून एकत्र काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘कॉकटेल’ चित्रपटात आम्ही पुन्हा एकत्र आलो. यावेळी आम्ही खूप धमाल केली, असा उल्लेखही दिपिकाने ट्विटमध्ये केला आहे.

दिपिकाने एक नव्हे, तर अनेक ट्विट करत दिनेशसोबतच्या कामाच्या आठवणीला उजाळा दिल्याचे दिसते. ट्विटच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करत तिने त्याच्याविषयी असणारा आदर दाखवून दिला. एवढेच नाही तर मला तुझी नेहमीच आठवण येते, तुला ही माझी आठवण नक्कीच येत असेल, असे सांगत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. दिनेश विजन दिग्दर्शित आणि होमी अदजानियाची निर्मिती असणारा ‘राबता’ हा चित्रपट ९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण गाण्यामध्ये छोट्याखानी भूमिकेत झळकताना दिसेल.

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘लव आज कल’ आणि होमी अदजानिया दिगदर्शित ‘कॉकटेल’ या दोन्ही चित्रपटात दीपिकासोबत सैफअली खान मुख्य भूमिकेत दिसला होता. तर दिनेश विजन याने सहनिर्माता म्हणून काम पाहिले होते.