‘वजनदार’ या शब्दाचा वापर हल्ली विविध कारणांनी केला जातो. पण, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मात्र या शब्दाचा वापर त्यांच्या चित्रपटातील वेशभूषेमध्येच करायला आवडतो असंच दिसतंय. ‘मियाँ वजन मे क्या रखा है..’ असं म्हणून जर तुम्ही कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर जरा सावध व्हा. कारण इथे ऐतिहासिक, भव्यपटांचा प्रश्न आला की त्याची वेशभूषा हीच पहिला चर्चेचा आणि वजनदार विषय असते हे सध्या ‘पद्मावती’ चित्रपटात दीपिकाने घातलेल्या भरजरी, महागडय़ा ड्रेसवरून सोशल मीडियावर जे चर्चेचं वादळ उठलंय त्यावरून स्पष्ट होतं. यानिमित्ताने, हिंदीत याआधीही ‘पाकिजा’, ‘मुघल-ए-आझम’सारखे भव्य चित्रपट झालेच होते की मग तेव्हा मधुबालाने अमुक एक किलोचा वजनदार अनारकली घातला आहे अशा गप्पा कधी ऐकल्या नव्हत्या. सध्या अशा चित्रपटांच्या आशयापेक्षा त्यातील कलाकारांचे कपडे, सेट याच्याच चर्चा जास्त रंगतात.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाचेच वारे सध्या प्रेक्षकांमध्ये, चित्रपटसृष्टीमध्ये आणि परिणामी ऐन दिवाळीत खरेदीसाठी निघालेल्या गर्दीमध्ये, कपडय़ांच्या, दागिन्यांच्या दुकानांमध्येही वाहात आहेत. या चित्रपटात भव्यतेच्या परिभाषा बदलणार याची प्रेक्षकांना अपेक्षा होतीच. पण, भन्साळींनी चित्रपटातील वेशभूषेचीही परिभाषा बदलली आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘पद्मावती’ ही भूमिका साकारण्यासाठी दीपिकाने बरीच मेहनत घेतली आहे. तिच्या देखण्या रूपामध्ये सर्वाचं लक्ष वेधलं ते म्हणजे दागिने आणि पारंपरिकतेची झाक असलेल्या तिच्या वेशभूषेने. भन्साळींच्या या स्वप्नवत चित्रपटासाठी दीपिकाने जवळपास ३५ किलोंचा लेहंगा घातला होता. ज्यासोबत असलेल्या ओढणीचं वजन चार किलो होतं. त्यामुळे ऐतिहासिक पात्र साकारण्याचा भार पेलण्यासोबतच तिने वेशभूषेचा भारही चांगलाच पेलला. तिच्या कपडय़ांचं वजन ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, हिंदी चित्रपटसृष्टीत आणि एकंदर भारतीय वेशभूषा प्रकारात ही गोष्ट काही नवी नाही. ‘पद्मावती’च्या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीत वजनदार वेशभूषेवर प्रकाश टाकला तर काही नावं समोर येतात. ज्यामध्ये दीपिका आणि भन्साळी या समीकरणाचेच दोन चित्रपट आहेत. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ या चित्रपटांमध्ये तिच्या वेशभूषेचं वजन बऱ्यापैकी होतं. ‘बाजीराव मस्तानी’मध्ये तर तलवारबाजीच्या एका दृश्यासाठी दीपिकाने सराव केला खरा. पण, पायघोळ पेहरावात सेटवर आल्यानंतर ‘अ‍ॅक्शन’ असं म्हणताच तिला कपडय़ांच्या वजनामुळे थोडीशी अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. इथे अर्थातच ही अवघड परिस्थिती रिटेकवर रिटेकने दूर करता येते.

‘..रामलीला’मध्ये अंजू मोदीने डिझाइन केलेला एक घागरा दीपिकाने घातला होता ज्याचं वजन जवळपास ३० किलो होतं. आणखी थोडं मागे गेलं तर ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक रोशन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘जोधा अकबर’ या ऐतिहासिक कथानकाच्या चित्रपटामध्ये ‘महाराणी जोधाबाई’ साकारण्यासाठी ऐश्वर्याला सुरेख लूक देण्यात आला होता. यामध्ये तिच्या वेशभूषेसोबत साजेसे दागिने मुघलकालीन आणि राजपूत संस्कृतीचं दर्शन घडवत होते. ऐश्वर्याने साकारलेल्या ‘जोधा’प्रमाणेच ‘देवदास’ या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितने साकारलेली ‘चंद्रमुखी’सुद्धा अनेकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली होती. या चित्रपटात ‘काहे छेड छेड मोहे..’ या गाण्यामध्ये तिने ३० किलोचा लेहंगा घातला होता. नृत्यामध्ये अदाकारी आणि भूमिकेचं सौंदर्यासोबतच वेशभूषेचं वजन सावरत तिने हे गाणं सादर केलं होतं. या पाश्र्वभूमीवर आणखी थोडं मागे गेलं तर चित्रपटसृष्टीत वेशभूषेमध्ये वजनदारपणा असण्याची उदाहरणं अगदी फार जुन्या चित्रपटांपासून पाहायला मिळतात. के. आसिफ यांच्या ‘मुघल-ए- आझम’ या चित्रपटातही ‘अनारकली’च्या रूपात हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या मधुबालाच्या सौंदर्याला चार चाँद लावत होता तिचा पेहराव. पेहराव, तिचं हास्य आणि ‘प्यार किया तो डरना क्या’ असं म्हणत आपल्या नजरेला भिडणारी तिची नजर या चित्रपटाचा जीव आहेत. त्यामुळे बहुधा तेव्हा तिच्या वजनदार कपडय़ांची फारशी चर्चा झाली नसावी.

एकंदर पेहरावामध्ये असणारा हा ‘वजनदारपणा’ पाहिला तर यामध्ये प्रत्येक दिग्दर्शकाने काळानुरूप बदल केले आहेत. पण, त्यासोबतच त्याचा पारंपरिकपणाही जपला आहे. यामध्ये फॅशन डिझायनर आणि कारागिरांची मेहनत प्रशंसनीय आहे. भारतात एम्ब्रॉयडरी, जर्दोसी, पॅचवर्क  या सर्व गोष्टी एखाद्या सर्वसामान्य कापडाचीही शोभा वाढवतात. पण, मुळात त्यांचं वजन जास्तच असतं. त्यातही अमुक एक नक्षी असलेल्या एम्ब्रॉयडरीचं वजन पेलण्यासाठी कापडही त्याच तोडीचं लागतं. त्यात कापडाचे एकावर एक येणारे थर, म्हणजेच ओव्हरलॅपिंग आणि लेअरिंग या गोष्टींची महत्त्वाची भूमिका असते. या साऱ्याचा समतोल साधत प्रत्येक वेळी अभिनेत्रीला शोभेल, त्या पात्राला न्याय देईल अशाच देखण्या वेशभूषेचं संशोधनपूर्वक डिझाइन केलं जातं. बरं हा सगळा वजनदार सांभार ऐतिहासिक चित्रपटांसाठीच असतो. अगदी ‘ए दिल है मुश्किल’सारख्या आत्ताच्या काळातील चित्रपटामध्येही अनुष्का शर्माने लग्नाच्या प्रसंगासाठी ‘चन्ना मेरेया’ या गाण्यात घातलेला लेहंगाही ३५ किलोचा होता. त्यामुळे आशय-विषय काहीही असो.. कपडय़ांच्या बाबतीत इथे सगळा मामला वजनदारच आहे असं म्हणावं लागेल.