बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि बहुचर्चित जोडी, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. पण, गेल्या काही काळापासून त्यांच्या या प्रेमाच्या नात्यामध्ये काही कारणास्व दुरावा आल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या काळात संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटासाठी दीपिका आणि रणवीर पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत. दीपिका आणि रणवीरच्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याविषयीच्या चर्चांना सरतेशेवटी दीपिकानेच पूर्णविराम दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर आणि दीपिका गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण, अजूनही या दोघांनीही त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी दोन्ही कलाकारांनी साखरपुडा केल्याचीही चर्चा होती. त्यामुळे दीपिका आणि रणवीरचे ‘यंदा कर्तव्य आहे…’ अशी आशा चाहत्यांना होती. पण, नुकतेच एका मुलाखतीदरम्यान बोलण्याच्या ओघात दीपिकाच्या बोलण्यावरून मात्र तसे काहीच जाणवले नाही.

रणवीरसोबतच्या नात्याविषयी बोलताना, ‘मी असे काहीही करणार नाहीए. कारण काही करण्यासाठी तसे काहीच नाहीए. मला या सर्व गोष्टींविषयी कोण काय आणि किती बोलतं आहे हे सर्व ठाऊक आहे. हे पाहा, तुम्ही फक्त त्याच गोष्टी करु शकता ज्या तुमच्या नियंत्रणात आहेत. मला असं वाटतं की, या इंडस्ट्रीमध्ये असण्याचे जितके फायदे आहेत तितके तोटेही आहेत. ब्रेकअप आणि लिंकअपच्या चर्चांबाबतही तसंच आहे. चित्रपटविश्वात आणि इंडस्ट्रीमध्ये या अशा गोष्टींचा सामना करावाच लागतो’, असे म्हणत दीपिकाने तिची भूमिका स्पष्ट केली.

येत्या काही दिवसांमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही जोडी पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटातून झळकणार आहे. एका ऐतिहासिक कथानकाची पार्श्वभूमी असणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूरही महत्त्वाचे पात्र रंगवणार आहे.