बॉलीवूडमध्ये सध्या सर्वाधिक कोणत्या रोमॅण्टीक जोडीबद्दल चर्चा केली जात असेल तर ती आहे, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. या प्रेमीयुगुलाने आतापर्यंत कधीच त्यांच्यातील नात्याचा खुलासा केलेला नाही. मात्र, ज्या पद्धतीने ते एकमेकांसोबत पार्टी किंवा इतर कार्यक्रमांमध्ये वावरताना दिसतात ते पाहता या दोघांमध्ये नक्कीच प्रेमप्रकरण चालू असल्याचे दिसून येते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या दोघांमध्ये आता प्रेमसंबंध राहिले नसल्याचे म्हटले जात होते. बॉलीवूडमधील इतर सेलिब्रिटी जोड्यांप्रमाणेच या जोडीतही दुरावा आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. पण, ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ अभिनेत्री दीपिकाने तिच्या स्वतःच्या शैलीत या सर्व वृत्तांना फेटाळून लावले आहे.

पिंकविला डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाने नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी तू आणि रणवीर सध्या एकत्र दिसत नाहीत? असा प्रश्न तिला करण्यात आला. त्यावर दीपिका लगेच म्हणाली की, काय ? कोणती बातमी? पुढे ती हसतचं म्हणाली, तुम्हाला काय वाटतं? मी कसं राहायला हवं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही सांगाल तसं मी वागेन. दीपिकाच्या या उत्तरानंतर पुढे कोणी काही बोललेच नाही.

दीपिकाने प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना अगदी हुशारीने उत्तरं दिली. दरम्यान, ‘xXx: द रिटर्न ऑफ झेंडर केज’ मधील तिच्या सहकलाकाराने देखील एकदा रणवीरचा उल्लेख दीपिकाचा बॉयफ्रेण्ड असा केला होता. इतकेच नव्हे तर, रणवीर आणि दीपिकाच्या जोडीला घेऊन चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त करताना दिग्दर्शक डीजे कार्सू यानेही ‘बेफिक्रे’ अभिनेत्याचा दीपिकाचा प्रियकर म्हणून उल्लेख केलेला. यानंतरही रणवीर आणि दीपिकामध्ये प्रेमसंबंध नसल्याचे म्हणणे चुकीचे ठरले. या दोन्ही कलाकारांची जोडी सुंदर दिसते यात काहीच शंका नाही. लवकरच हे दोघही संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेता शाहिद कपूर याचीही चित्रपटात मुख्य भूमिका आहे. याआधी रणवीर-दीपिकाने ‘राम लीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मात्र, शाहिदने त्यांच्यासोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.