दिवाळी सुरू झाली आणि सगळीकडे सेलिब्रेशनचा मूड तयार झाला. प्रत्येकजण आपआपल्या मित्र परिवारासोबत आणि कुटुंबासोबत दिवाळी सणाचा आनंद अनुभवण्याकडे जास्त लक्ष देतो. मग कलाकार तरी यातून कसे मागे राहतील. सेलिब्रेटींमध्येही दिवाळीचा उत्साह जोमात दिसून येत आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार दिवाळीमध्ये खास कामातून सुटी काढत आपल्या परिवारासोबत सण साजरा करण्याचे प्लॅनिंग करत असतात.

दीपिका पादुकोनही याच कलाकारांपैकी एक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका दिवाळीसाठी तिच्या घरी बंगळुरूला जाणार आहे. तेथे आपल्या कुटुंबासमवेत ती या दिवाशी सणाचा आनंद घेणार आहे. यावेळी दीपिका म्हणाली की, ‘लहानपणापासून मला दिवाळी हा सण खूप आवडतो. शाळेत असताना तर दिवाळीच्या सुट्यांची मी आवर्जुन वाट पाहायचे. यंदा मला कामाच्या व्यस्त कारभारातून थोडा वेळही मिळाला आहे. हा वेळ मी कुटूंबासोबत घालवण्यासाठी बंगळुरूला जात आहे.’

एक रंजक गोष्ट म्हणजे तिच्या घरामध्ये सर्वांची नावे ही दिवाळीशी निगडित आहेत. ‘दीपिका’, वडिल ‘प्रकाश’, आई ‘उजाला’ आणि बहीण ‘अनुषा’ सगळ्यांचीच नावे ही दीवाळी सणाशी निगडीत आहेत. दिवाळी सणाचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर दीपिका संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमाच्या तयारीला लागणार आहे. लवकरच सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार असून त्यापूर्वी आपापल्या भूमिका व्यवस्थित समजून घेण्यासाठी वर्कशॉप घेतले जाणार आहे.

दरम्यन, संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ हा सिनेमा सध्या खडतर काळातून जात आहे असेच म्हणावे लागेल. या सिनेमाचे शुटिंग सुरु होण्याआधीपासूनच कोणत्या कलाकारांना या सिनेमात घ्यायचे यावरुन गोंधळ उडाला होता. आता त्या गोंधळातून सावरतोय न सावरतोय तोच दुसरं एक संकट समोर आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाचे निर्माते इरॉस इंण्टरनॅशनल यांनी ‘पद्मावती’ या सिनेमातून आपले हात काढून घेतले आहेत. भन्साली सध्या नवीन निर्मात्यांच्या शोधात आहेत. या सिनेमाचे बजेट साधारणतः १८० कोटी रुपये एवढे आहे.