बॉलिवूडची मस्तानी दीपिका आता हॉलिवूडची राणी झाली आहे. हॉलिवूड सहकलाकार विन डिझेलला ‘कटिंग चाय’ पाजणाऱ्या दीपिकाने विन भारतातून परतल्यानंतर त्याच्याविषयी आपल्या मनात निर्माण होणारी भावना व्यक्त केली. ‘ट्रिपल एक्स रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिकाने नुकतेच अमेरिकेतील एका वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दीपिकाने विन बाबतच्या आकर्षणाचा किस्सा सांगितला. दीपिका म्हणाली की, माझी आणि विनची केमिस्ट्री खूपच चांगली आहे. मला नेहमी असे वाटते की, आम्ही दोघे एकत्र राहत आहोत. एवढेच नाही तर आम्हाला गोंडस मुले असल्याचे विचार देखील माझ्या डोक्यात येत असतात. हे सांगितल्यानंतर हे विचार फक्त माझ्या डोक्यातच आहेत, असे देखील दीपिकाने सांगितले. दीपिकाची ही मुलाखत भारतामध्ये गुरुवारी प्रसारित होणार आहे.


दीपिका पदुकोणचा पहिला वहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स…’ १४ जानेवारीला भारतात प्रदर्शित झाला. भारतात या चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी खुद्द हॉलिवूड स्टार विन डिझेल आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक डी. जे. कॅरुसोही भारतात आले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने  त्यावेळी सोशल मीडिया आणि चित्रपट वर्तुळावर याविषयीच्याच चर्चांना उधाण आले होते. यावेळी दीपिकाने मोठ्या उत्साहात विनसोबत तिच्या या पहिल्या हॉलिवूडपटाचे प्रमोशन केले. चाहत्यांच्या उदंड प्रतिसादाचा आणि प्रेमाचा अनुभव घेतल्यानंतर विन डिझेल मायदेशी परतला आहे. पण, भारतातून बऱ्याच आठवणींचा ठेवा त्याने आपल्यासोबत नेला आहे. भारतात असताना विनच्या पाहुणचारामध्ये दीपिकाने कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही.

भारतभेटीमध्ये विन डिझेलने रणवीर सिंगचीही भेट घेतली होती. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा काही नवीन नाही. पण या दोघेही प्रेमसंबंधावर कधीही खुलेपणाने बोलताना दिसलेले नाहीत. विन डिझेलने मात्र रणवीरला या भेटीत धक्काच दिला होता. भारतीय प्रसारमाध्यमांसमोर रणवीरचे कौतुक करताना विनने त्याचा उल्लेख दीपिकाचा बॉयफ्रेंड असा केला होता.  जेव्हा विनने रणवीरबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा दीपिकाच्या चेहऱ्यावरचे भाव सर्व काही सांगून जात होते.