हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी तुमची आवडती अभिनेत्री कोण? असे विचारले तर दीपिका पदुकोणलाच अनेकांची पसंती मिळते. ‘ओम शांति ओम’ या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. किंग खानसोबत आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणारी दीपिका सध्या रसिकांच्या गळ्यातील ताइत बनली आहे. तिने साकारलेल्या ‘लीला’ आणि ‘मस्तानी’च्या भूमिकांना रसिकांची विशेष दाद मिळाली. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच मोठ्या प्रमाणावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री सध्या बॉलिवूड गाजवत आहे.

पण, अनेकांच्या मनाला भुरळ घालणाऱ्या दीपिकाच्या मनावरही कोणीतरी भुरळ घातली होती. असे म्हटले तर आजही कित्येकांना विश्वासच बसत नाही. एका कार्यक्रमामध्ये आलेल्या दीपिकाने तिच्या पहिल्या ‘क्रश’विषयी आणि पहिल्या चुंबनाविषयीचे सत्य उलगडले आहे. जिच्यावर अनेकांचे हृदय जडले आहे अशा दीपिकाचे पहिले ‘क्रश’ होता अभिनेता ब्रॅडली कूपर.

आपल्या पहिल्या ‘क्रश’विषयी सांगताना दीपिकाने तिच्या पहिल्या ‘किस’ विषयीचे गुपितही उलगडले आहे. आजवर विविध चित्रपटांमधून दीपिकाची चुंबनदृश्ये रसिकांनी पाहिली आहेत. पण, तिने पहिल्याच वेळेस केणाला ‘किस’ केले असेल? हा प्रश्न नकळत अनेकांच्या मनात घिरट्या घालत असेल. पण दीपिकाने हे गुपितही आता सर्वांसमोर उलगडले. ‘मी अगदी लहान असताना पहिल्यांदा किस केले होते’, असे ती म्हणाली यावर ‘तू कोणाला ‘किस’ केले होतेस’ असा उलट प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला असता मिश्किलपणे हसत दीपिका म्हणाली, ‘कोणाला म्हणजे काय? सहाजिकपणे….माझ्या पालकांना’.

एखाद्या प्रश्नापासून पळ काढण्याच्या दीपिकाच्या शक्कलीने तिला या प्रश्नापासून तारुन नेलं. तिच्या या उत्तरामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला असेच म्हणावे लागेल. बॉलिवूडमध्ये यश संपादन केल्यानंतर सध्या दीपिका हॉलिवूड चित्रपटामध्ये व्यग्र आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डिझेलसोबत ‘xxx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटातून सेरेना उनगेरची भूमिका साकारताना दिसणार आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्याच्या १९ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामागोमागच दीपिका पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. ‘पद्मावती’ या चित्रपटात दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारणार असून शाहिद तिच्या पतीच्या भूमिकेत दिसेल.