‘मला अभिनयाची तालीम करायला आवडत नाही. त्यामुळे त्यातील भावनेचा उत्स्फूर्तपणा निघून जातो. रोजच्या जगण्यात आपण व्यक्तींचे कसे निरीक्षण करतो, लहान-लहान गोष्टींकडे किती बारकाईने पाहतो हीच प्रत्येक भूमिकेसाठीची तयारी असते. कुठल्या भूमिकेसारखा अभिनय करणे मला जमत नाही. मीच ती भूमिका झाले तर प्रेक्षकांनाही ती खरी वाटेल असे मला वाटते,’ असे सांगून प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल यांनी आपल्या अभिनयाची ‘मेथड’ उलगडली.

मेहता प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘द मॅड तिबेटियन- गोष्टी तेव्हाच्या आणि आताच्या’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी दीप्ती नवल यांच्या हस्ते झाले. हे मूळ पुस्तक दीप्ती नवल यांनीच लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. अभिनेत्री अमृता सुभाष, लेखिका वीणा देव, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, प्रकाशक सुनील मेहता या वेळी उपस्थित होते. प्रकाशनानंतर अमृता सुभाष यांनी दीप्ती नवल यांची मुलाखत घेतली.

‘आपण पुढे कसे घडतो, जीवनाला कसे सामोरे जातो या संदर्भात आपल्याला बालपणी आलेले अनुभव फार महत्त्वाचे असतात. मी अभिनयाचे शिक्षण घेतलेले नाही. अमृतसरच्या गजबजलेल्या भागात मी वाढले. तिथे अनेक वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे बघायला मिळत. तेव्हा नकळत मी त्यांचे निरीक्षण करत होते. अभिनय क्षेत्रात आल्यानंतरही इतर अभिनेत्यांचे निरीक्षण करत असे. ‘मेथड अ‍ॅक्टिंग’विषयी इतर अभिनेते बोलत. माझी अभिनयाची ‘मेथड’ काय असेल याचा मी विचार केला. एखादी भूमिका साकारताना मी त्या भूमिकेच्या नजरेतून विचार करू लागले, तर प्रेक्षकांनाही ती भूमिका खरे वाटेल. नेहमीच्या जगण्यातून कोणत्याही भूमिकेसाठीचा साठा तयार होतो,’ असे दीप्ती नवल यांनी सांगितले.

‘मला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी विशेष संघर्ष करावा लागला नाही, पण आपल्याला काय उंची गाठायची आहे ते आपण ठरवतो, तेव्हा संघर्ष सुरू होतो. हवी तीच भूमिका करायचे ठरवले त्या काळात माझ्यातील इतर कलांनी मला तारले. जीवनाचा घेतलेला अनुभव माझ्या कामातून उतरायला हवा असे मला वाटते. माझी आई चित्रकार आणि वडील लेखक असल्यामुळे लहानपणापासून मी त्यांच्या त्या गोष्टी घेतल्या होत्या. या कला नसत्या तर मला नैराश्यच आले असते. तशीही वेळ आली होती, परंतु मी त्यातून उभी राहिले. काही वेळा माझ्याकडे चांगल्या भूमिका नव्हत्या. उपजीविकेसाठी काही वाईट भूमिकाही केल्या. पण मग मी स्वत:चे खर्च कमी करायचा निर्णय घेतला. वाईट भूमिका करत राहण्यापेक्षा आपण ट्रेकिंग करूया, त्या निमित्ताने खऱ्या लोकांना भेटायला मिळेल, असा विचार मी केला,’ असे दीप्ती नवल म्हणाल्या.

मुलाखतीनंतर दीप्ती नवल यांनीच दिग्दर्शित केलेला ‘चार आनेकी धूप, दो पैसेकी बारिश’ हा अप्रकाशित चित्रपट दाखवण्यात आला.