मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी धनुषच्या शरीरावर असणाऱ्या जन्मखुणेच्या अहवालाची तपासणी केली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर २८ फेब्रुवारीला राजाजी सरकारी रुग्णालयाचे अधिष्ठाता वेरामुत्तु राडू आणि मदुराई मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका मीनाक्षी सुंदरम यांच्याद्वारे हा वैद्यकीय अहवाल तयार करण्यात आला होता. वैद्यकीय अहवालानुसार, धनुषच्या शरीरावरील खुणांची टॉर्चचा साह्याने पाणी आणि स्पिरीटच्या मदतीने तपासणी करण्यात आली. त्याच्या डाव्या खांद्याजवळ आणि कोपऱ्याजवळ कोणताही तीळ किंवा जखमेची खूण नाही.

छोट्या तिळाला नष्ट करणे शक्य आहे असे त्या अहवालात स्पष्ट केले आहे. पण कोणत्याही मोठ्या जखमेला प्लॅस्टिक सर्जरी करुनही पूर्णपणे मिटवता येत नाही. जास्तीत जास्त त्या जखमेची खूण कमी केली जाऊ शकते. छोट्या निशाणाला लेझरच्या साह्याने सहज मिटवता येऊ शकते.
त्यामुळे धनुषचे खरे आई-बाबा कोण हा वाद आता अधिकच चिघळत जाताना दिसत आहे. तमिळनाडूमधील कथिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी या जोडप्याने धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. पण धनुषने मात्र याला नकार दिला आहे. हे जोडपे फक्त पैशांसाठी हे सर्व करत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

न्यायालयाने या जोडप्याच्या मागणीवरुन जन्मखूण तपासणीची चाचणी केली होती. धनुषने कोणत्याही प्रकारचा भत्ता द्यायला नकार दिला म्हणून त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली. तसेच त्यांनी धनुषचे नाव कलाईसेल्वन ठेवले होते आणि मेलूर येथील शाळेत त्याचे नावही दाखल केले होते. मलमपट्टी येथे राहणाऱ्या या जोडप्याने पुरावे म्हणून धनुषच्या जन्माचा दाखला आणि त्याचे लहानपणीचे फोटो न्यायालयासमोर सादर केले आहेत.