आत्मचरित्रपट आणि खऱ्या हिरोंवर चित्रपट काढण्याचा सध्या बॉलिवूडमध्ये ट्रेण्ड रुळला आहे. अशा चित्रपटांतून बऱ्यापैकी गल्ला जमतो तसेच, सामाजिक विषयांना हाताळल्यामुळे दिग्दर्शकांचीही बरीच स्तुती केली जाते. आता या बायोपिकच्या मांदयाळीत आणखी एक चित्रपट येणार आहे.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक धिरज कुमार आता उज्मा अहमद हिची कथा रुपेरी पडद्यावर आणणार आहे. भारतीय मूळ असलेल्या उज्माचे पाकिस्तानमध्ये बंदुकीच्या धाकावर ताहिर अली याच्याशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलेले. ताहिर मूळचा पाकिस्तानचाच आहे. पण, कायदेशीर लढा देऊन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या ‘हिंदोस्तान की बेटी’ला भारतात परत आणले. याचवर्षी मे महिन्याच्या २५ तारखेला उज्मा भारतात परतली.

वाचा : अर्जुन विचारतोय, ‘कोण आहेत ही मुलं?’

उज्माच्या आयुष्यावरील चित्रपटात सुषमा स्वराज यांची भूमिका साकारण्यासाठी धिरज कुमारने अभिनेत्री तब्बूला विचारणा केलीये. तर उज्माच्या भूमिकेसाठी परिणीतीला विचारण्यात आल्याचे कळते. याविषयी धिरज म्हणाला की, ‘आम्ही ठरवत असलेल्या नावांपैकी परिणीती ही नक्कीच एक आहे. या भूमिकेसाठी एका दमदार अभिनेत्रीची गरज आहे. पण कलाकारांच्या निवडीविषयी आता बोलणे खूपच घाईचे होईल.’ दरम्यान, अनिल कपूर यात भारतीय उप-उच्चायुक्त जेपी सिंग यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.

वाचा : प्रार्थना बेहेरेच्या ‘अनान’चा टीझर

चित्रपटाच्या कथेकरिता धिरजने उज्माची काहीवेळा भेटही घेतली. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरु आहे. ‘उज्माच्या आयुष्याबद्दल कळल्यानंतर मला फार वाईट वाटले. मी तिला काहीवेळा भेटलो. तिला कशाप्रकारे शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले याबद्दलही तिने मला सांगितले. तिने या सगळ्यातून स्वतःची सुटका कशी करुन घेतली आणि या प्रकरणातील सरकारची भूमिका यावर माझा चित्रपट आधारित असेल.’

येत्या नोव्हेंबरपासून चित्रिकरणाला सुरवात करून वर्षाअखेरपर्यंत तो संपवण्याचा दिग्दर्शकाचा मानस आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.