हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मंगळवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार हे काही दिवसांतच त्यांचा ९४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. पण, त्याआधीच त्यांच्या उजव्या पायाला सूज आल्यामुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे त्यांची पत्नी सायरा बानो यांनी सांगितले. दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे कळताच ट्विटरद्वारे चाहत्यांनी त्यांच्या नावे लवकर बरे होण्याचे संदेश पाठवले. चाहत्यांच्या याच प्रेमामुळे आणि प्रबळ इच्छाशक्तिमुळे दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती मिळत आहे.

खुद्द दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे यासंबंधीचे ट्विट करण्यात आले आहे. ‘माझी प्रकृती सुधारतेय. नेहमीच्याच तपासणीसाठी मी रुग्णालयात दाखल झालो होतो. तुमच्या सर्वांच्याच प्रार्थना माझ्यासोबत आहेत’, असे दिलीप कुमार यांनी ट्विट केले. यासोबतच त्यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या डॉक्टरांचे नावानिशी आभारही मानले आहेत. ‘आरोग्यच खरी संपत्ती आहे’, असे आणखी एक ट्विट करत दिलीप कुमारांनी चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

दिलीप कुमार यांनी हे ट्विट केल्यामुळे सध्या चाहत्यांमध्येही काहीसे आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या ट्विटद्वारे सायरा बानो आणि दिलीप कुमार यांचे रुग्णालयातील फोटोही पोस्ट करण्यात आले. दरम्यान, या एव्हरग्रीन अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर सायरा बानो यांनी यासंदर्भात बॉम्बे टाईम्सशी बोलताना सांगिकते की, ‘मी असेही त्यांना नेहमीच्या तपासणीसाठी रुग्णालयात नेण्याच्या विचारात होते. पण त्यांच्या पायाला आलेल्या सूजेमुळे मी तातडीने रुग्णालय गाठले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून सर्दीचाही त्रास होत आहे. दिलीप साहेबांच्या आरोग्याच्या अगदी लहानातल्या लहान तक्रारीच्या बाबतीत मी कोणताही हलगर्जीपणा करत नाही’, असे म्हणाल्या. ‘सध्या ते डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. मी आशी आशा व्यक्त करते की काळजी करण्यासारखे काहीच कारण नसावे आणि त्यांच्या वाढदिवसापूर्वीच मी त्यांना घरी नेऊ शकेन’, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, गेल्या वर्षभरामध्ये वाढते वय आणि प्रकृती खालावल्याच्या कारणांमुळे दिलीप कुमार यांना बऱ्याचदा रुग्णालयात दाखत करण्यात आले होते. दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जाते. दिलीप साहेबांच्या आजारपणामध्ये सायरा बानो त्यांची फार काळजी घेतात हे तर सर्वच जाणतात. त्यामुळे सध्या दिलीप कुमार यांनी प्रकृती सुधारावी अशीच चाहत्यांचीही इच्छा होती.