जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ (१९७५) चित्रपटाने बर्लिन महोत्सवात झेप घेतल्याचे आपण नेहमीच कौतुक करतो. पण त्यापुढची गोष्ट फारच कमी वेळा चर्चेत आली. ती म्हणजे, आरामदायक विमान प्रवास झाल्यावर या चित्रपटाचे एक निर्माते रामदास फुटाणे यांनी त्यानंतरचा जामखेडपर्यंचा प्रवास चक्क ‘लाल डब्बा’ एसटीतून उभं राहून केला. अहो करणार काय, गाडीत बसायला तर मिळायला हवे. मराठी चित्रपट बर्लिनला पोहचला तरी त्याचा निर्माता एसटीतच राहिला, हे त्या काळातील खूपच मोठे ‘वास्तव’ होते. इतकेच नव्हे तर त्या काळात मुंबई- पुण्यावरुन कित्येक तालुक्यात दिवसाला एसटीच्या दोनच फेऱ्या असत.

विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ ( १९९१) ने महाराष्ट्रभर गर्दीचा अक्षरश: विक्रम केला . पण नातीपुती, सांगोला अशा तालुक्याच्या ठिकाणी तर या चित्रपटाचे वेड असे काही होते की गावागावातून एस. टी.ने येणारा ग्रामीण प्रेक्षक ती गाडी अगोदर चक्क थियेटरवर घ्यायला लावत व मग ती जवळपास रिकामी झालेली एस.टी. स्थानिक डेपोत जाई. एकूणच मनोरंजन क्षेत्राचे एसटीशी अर्थात राज्य परिवहन सेवेशी नाते खूपच जुने व विविध स्तरावर आहे.

आज मल्टीप्लेक्स युगात यूएफओ माध्यमातून चित्रपट दूरवर कोणत्याही चित्रपटगृहात दाखवता येतो. पण चित्रपटाच्या जन्मापासून ते या तंत्रज्ञानाचा शोध लागेपर्यंत प्रत्येक चित्रपटाची प्रिंटच काढावी लागे. देशभरातील सर्वच एकपडदा चित्रपटगृहात ती प्रिंटच वापरली जाई. ( आजही शिल्लक राहिलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये तीच पध्दत आहे.) पण या प्रिंट लॅबोरेटरीतून वितरकाकडे येत अथवा त्याचे वेगळे गोडाऊन आहे. समजा महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होतोय तर त्याची थिएटरकडे प्रिंट पाठवायचे मार्ग कोणते? अर्थात ते मुंबईतील नाझ चित्रपटगृहाच्या अंतरावर ठरे. हमाल ती प्रिंट डोक्यावरून नेईल/ हातगाडी/ टॅक्सी/ खाजगी गाडी/ टेम्पो/ रेल्वे व एस.टी…. मुंबई सेंट्रलला गावानुसार चित्रपटाची प्रिंट वर चढवली जाई. आणि त्या तालुक्याला गेल्यावर ती प्रिंट स्थानिक थिएटरवाला उतरवून घेई. खराब रस्ते व मध्येच एस.टी. बंद पडणे यामुळे प्रिंट पोहचायला उशीर होई. कधी घाईघाईत मुंबई सेंट्रललाच दुसऱ्या गाडीवर प्रिंट चढे व गोंधळ उडे.

वाचा : जाणून घ्या, ‘गोलमाल अगेन’ची पहिल्या दिवसाची कमाई

निर्माता अजय सरपोतदारने ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ च्या प्रिंटचा सांगितलेला किस्सा भन्नाट आहे. त्या चित्रपटाची प्रिंट अशीच चुकून दुसर्‍याच गावाला गेली हे एक दोन दिवसांनी लक्षात आले ( स्थानिक थिएटरवाला समजला की आजची एस. टी. चुकली म्हणून उद्या प्रिंट येईल. पण तरीही आली नाही. ) मग प्रिंट नेमकी कोणत्या गावाला गेली? चोरीला गेली तर चोर त्या प्रिंटचे करणार काय? एखाद्या थिएटरवर त्याने ती नेली तर पकडले जाणार. पण ‘एस.टी.तून हरवलेल्या प्रिंट’ चा शोध तर घ्यायलाच हवा. तो शोध जाऊन पोहचला एका तंबू थिएटरमध्ये! तेथे हा चित्रपट गर्दीत दाखवला जात होता. पण चोरी सिद्ध कशी करणार? त्यानंतर अजय सरपोतदारने स्वतःच्याच चित्रपटाचे तिकीट काढून तो तेथे पाहिला व मग स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपल्याच चित्रपटाची प्रिंट सोडवून घेऊन ती एस.टी.ने नियोजित तालुक्याला पाठवली. त्या काळात चित्रपटवेड्या एसटी ड्रायव्हर व कंडक्टरचा चित्रपट वितरक व प्रदर्शकांना मोठाच आधार वाटे. ते ‘गावाच्या थिएटर’मध्ये व्यवस्थित प्रिंट पोहचवतील व उतरलेल्या चित्रपटाची प्रिंट परत आणतील असा त्यांच्यावर विश्वास असे. पडद्यावर येणार्‍या चित्रपटाभोवतीचे जग खूपच मोठे व अनेक गोष्टींतून पुढे सरकले/ सरकतंय हे तुमच्या लक्षात आले असेलच.

खासगी बससेवा व अगदी स्वतःची गाडी असणार्‍या मराठी कलाकारांचे प्रमाण वाढण्यापूर्वीच्या काळात मराठीतील मोठे कलाकार देखील एस.टी.नेच मुंबई- पुणे- कोल्हापूर असा प्रवास करीत. त्यात काहीही गैर वा वावगे वाटत नव्हते. त्या काळात मराठी चित्रपटसृष्टी गरीब मात्र प्रामाणिक म्हणून ओळखली जाई. ‘येथे सर्व स्तरावर साधी माणसं काम करतात’, असे वातावरण होते. त्यामुळेच कलाकार व सहप्रवाशी यांना एस.टी.तून प्रवास आपलासा वाटे. उंची प्रवास व राहणीमान व्यवस्था हवीच हे कोणाच्याही मनात येत नसे. १९८२ साली मुंबई- पुणे एशियाड बस सुरू होताच आपल्या प्रवासाची शैली उंचावली असे अनेक मराठी कलाकारांना मनोमन वाटते . हेच साधेपण त्या काळातील मराठी चित्रपटात असल्याने ते समाजाशी जास्तच जोडले गेले.

एकदा आशा काळे अशाच एशियाड बसने प्रवास करताना सहप्रवाशांशी सह्रदयपूर्ण वागताच एकाने मराठी वृत्तपत्रात तसे पत्र लिहून त्याची दखल घेतली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करताना कलाकार सामान्य माणसाशी जोडला गेला हे एसटीचे मोठेच देणे. आज मराठी कलाकार सेलिब्रिटी झाल्याने ते एसटीतून प्रवास करतील ही कल्पनाच आपण कशी करु? पण कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला अनेक कलाकार याच एसटीतून आपल्या गावातून मुंबईत आले. मलकापूरचा संदीप पाठक ते सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावातील सीया पाटील असे असंख्य कलाकार अगदी नवीन असताना याच एसटीतून प्रवास करत. अर्थात मनोरंजन क्षेत्रात सगळेच कलाकार आपल्या गाडीने प्रवेश करीत नाहीत. अनेकांना खूप खूप कष्टाने मुंबईत गाडी व स्वतःचे घर घेता येते. त्यातील काही अगदी सुरुवातीचे एसटीतून प्रवास केल्याचे अनुभव विसरत नाहीत. अथवा असेही म्हणता येईल की, खेड्यापाड्यातील अनेक कलाकार/ तंत्रज्ञ व कामगार यांना एसटीने मुंबईतील मनोरंजन विश्वाचा मार्ग दाखवला.

वाचा : ‘आठवणीतील दिवाळी म्हटली की ‘मोती साबणा’चा सुवास अजूनही गंधित होत जातो’

वातानुकूलित एशियाड अर्थात शिवनेरी, अश्वमेध वगैरे एस.टी.च्या प्रगत गाड्या खूपच अलीकडे आल्या. त्यातून मराठी मालिकेतील काही कलाकार प्रवास करताना हमखास दिसतात. त्यात वावगेही काहीच नाही आणि या प्रवासात बरीच प्रायव्हसी असते. लाल डब्यात ही आपण फक्त आपल्यापुरते पाहायचे ही संस्कृती नाही व तेथे ती येणारही नाही. असो.

काही मराठी व हिंदी चित्रपटातून एखाद्या दृश्यात एस.टी. असते/ दिसते. तेव्हा एखाद्या शहरी प्रवाशाला अर्थात प्रेक्षकाला आपल्या गावची आठवण येतेच…..

– दिलीप ठाकूर