चित्रपट निर्मितीसाठी किती काळ लागतो असा प्रश्न विचारल्यास जास्तीत जास्त दोन वर्षे लागत असतील असे उत्तर सध्या ऐकायला मिळेल. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की अत्यंत कमी कालावधीत आजकाल चित्रपटांची निर्मिती होते. पूर्वीच्या काळी एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी साधारण पाच ते सहा वर्ष लागत असत. पण एखाद्या चित्रपटासाठी २० वर्षं लागले असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का?

एका जुन्या बॉलिवूड चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल २० वर्षे लागले होते. ‘लव्ह अँड गॉड’ असे या चित्रपटाचे नाव असून अनेक अडचणींमुळे हा एवढा कालावधी लागला. दिग्दर्शक के. आसिफ यांचा हा चित्रपट अनेक वर्षे रखडला होता. ‘मुघल-ए-आझम’ सारखा प्रचंड गाजलेला चित्रपट के. आसिफ यांनीच दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील मधुबाला, दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर यांच्या अभिनयाचे आज देखील कौतुक केले जाते.

love-and-god-1

love-and-god-2

वाचा : ‘मी १८ वर्षांचा असताना ५ वर्षांच्या मुलीशी लग्न करेन असा कधीच विचार केला नव्हता’

‘लव्ह अँड गॉड’ चित्रपटात गुरु दत्त मुख्य भूमिका साकारत होते. मात्र चित्रीकरणादरम्यान १९६४ साली त्यांचे निधन झाले. तोपर्यंत चित्रीकरणाचे ५० टक्के काम झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर १९७० मध्ये संजीव कुमार यांच्यासोबत पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र चित्रीकरण सुरू असताना १९७१ मध्ये दिग्दर्शक आसिफ यांचे निधन झाले. त्यामुळे पुन्हा चित्रपट रखडला. अखेर १५ वर्षांनंतर त्या चित्रपटाचे चित्रीकरण आसिफ यांच्या पत्नीने पूर्ण केले. १९८६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच १९८५ मध्ये संजीव कुमार यांचे निधन झाले होते.