प्रयोगशीलता या शब्दाचं अचूक उदाहरण पाहायचं असेल तर चित्रपटसृष्टीहून जास्त चांगला पर्याय असूच शकत नाही. अवघ्या काही तासांच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर एखादं कथानक सादर करण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित प्रत्येक कलाकार नवनवीन प्रयोग करत असतो. नव्या संकल्पना आणि त्या राबवण्यासाठीची प्रयोगशील वृत्ती याच निकषांच्या आधारे मराठी चित्रपटसृष्टीतही असाच एक प्रयोग करण्यात आला आहे.

दिग्दर्शक संजय जाधवने त्याच्या आगामी ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटातील एका दृश्यासाठी एक- दोन नव्हे तर तब्बल ६० कॅमेऱ्यांचा सेटअप लावला होतं. संजय जाधवचे आतापर्यंतचे चित्रपट पाहता त्याच्या या नव्या प्रोजेक्टसाठीही उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळतंय. प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि कथानकाची गरज जाणत संजयने निर्माते अमेय खोपकर यांच्याकडे ६० कॅमेऱ्यांची मागणी केली.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

नेमकं कोणत्या दृश्यासाठी त्याने कॅमेऱ्यांचा इतका भव्य सेट लावला आहे ही बाब अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता या एका दृश्यासाठी प्रेक्षकांमध्येही बरंच कुतूहल पाहायला मिळतंय. मराठी चित्रपटसृष्टी इतक्या मोठ्या पातळीवर कॅमेरा सेटअप लावत एका दृश्याचं चित्रीकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली असून, यापुढे त्यात कोणते नवे प्रयोग करण्याचं योजलं आहे, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अमेय खोपकर यांच्या ‘एवीके फिल्म्स’ची निर्मिती असलेला आणि परफेक्ट ‘एण्टरटेन्मेन्ट पॅक’ असणारा हा चित्रपट ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.