अमित मसुरकर दिग्दर्शित ‘न्यूटन’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. राजकुमार रावची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची निवड ऑस्करच्या शर्यतीसाठी करण्यात आली असून, परदेशी भाषा विभागामध्ये भारताकडून हा चित्रपट पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. कथानक मांडण्याची पद्धत आणि कलाकारांचा दमदार अभिनय या साऱ्याच्या बळावर ‘न्यूटन’च्या वाट्याला हे यश आलं आहे. या शर्यतीत ‘न्यूटन’ला आव्हान होतं ते म्हणजे राजामौलींच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचं. पण, ‘न्यूटन’चा फॉर्म्युला ‘बाहुबली २’वर भारी पडला असंच म्हणावं लागेल. याविषयी राजामौली काय प्रतिक्रिया देणार हाच प्रश्न पुढे येत होता. त्याचच उत्तर देत नुकतच त्यांनी ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना आपलं मत मांडत पुरस्कर मिळवण्यापेक्षा भव्य कथानक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर जास्त भर देतो असं स्पष्ट केलं.

‘ऑस्करच्या शर्यतीत ‘बाहुबली २’ला स्थान मिळालं नाही याबद्दल मला दु:ख झालं नाही. मी ज्यावेळी चित्रपट बनवतो तेव्हा कोणत्याही पुरस्काराचा विचार करत नाही. किंबहुना ते माझं ध्येयच नसतं. चित्रपट साकारताना कथानकाला पूर्ण न्याय देणं हा माझा मुख्य उद्देश असतो. त्यानंतर चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो’, असं ते म्हणाले. त्याशिवाय आपण चित्रपटाच्या कमाईलाही महत्त्वं देत असल्याचही त्यांनी सांगितलं.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

‘पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी सर्वतोपरी महत्त्वाची गोष्ट नाही. पुरस्कार मिळाला तर मला आनंद होतोच. पण, पुरस्कार मिळाला नाही तरीही मला त्याचं फारसं काही वाटत नाही. कारण, त्या गोष्टींची मी अपेक्षाच करत नाही’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या शर्यतीत निवड होणं ही कोणत्याही चित्रपटाच्या टीमसाठी फार आनंदाचीच बाब असते. ‘बाहुबली’च्या वाट्याला हा आनंद येऊ शकला नाही. या एका गोष्टीची अनेकांनाच खंत आहे. पण, खंत करत राहणाऱ्यांपैकी आपण नाही हेच राजामौली यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.