एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रभासच्या वाढदिवसाच्या दिवशी या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची भव्यता आणि कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सध्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. असे असतानाच या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ‘बिहाइण्ड द सीन्स’चा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अवघ्या काही मिनिटांमध्ये ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या सेटची झलक पाहायला मिळत आहे. खुद्द राजामौली त्यांच्या या ‘बिग बजेट’ प्रोजेक्टबद्दल सांगत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये ‘कटप्पा’सुद्धा दिसत आहेत. कटप्पा काहीतरी बोलणार तितक्यातच त्यांना एका दृश्याच्या चित्रीकरणासाठी जावे लागत आहे. कला दिग्दर्शक साबू सायरिल यांनी ‘बाहुबली २’ साठी नवीन साम्राज्य उभं केलं आहे. ‘बाहुबली २’ साठी बनलेल्या या नवीन साम्राज्यचे फोटोही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. ‘बाहुबली २’ चा हा सेट बनवण्यासाठी सुमारे ३०० ते ५०० कामगार वापरण्यात आले होते.

या चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे चित्रीकरण हैदराबादमध्ये केले गेले आहे. सांगण्यात येत आहे की, या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. सिनेमाच्या पहिल्या भागाचा ट्रेलर अनेकांना आवडला होता. त्यामुळे या दुसऱ्या भागाचा ट्रेलरही अनेकांना आवडेल अशी अपेक्षा केली जात आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाने फक्त भारतातच नाही तर विदेशातही आपल्या नावाचा बोलबाला गाजवला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले होते.

बाहुबली या चित्रपटाची लोकप्रियता पाहता त्याच्या पहिल्या भागात अनुत्तरित राहिलेल्या ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले?’ या प्रश्नाचे उत्तर ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या चित्रपटात तरी मिळणार का? यासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.