दोन लहान मुलं एकमेकांशी मारामारी करताना ‘हे ढिश्शूम.. हे ढिश्शूम’ करत आपणच कसे हिरो आहोत हे आजूबाजूच्यांना दाखवून देण्याचा बालसुलभ प्रयत्न करत असतात. मग या खोटय़ा ढिश्शूम ढिश्शूमसाठी ते आपापल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी तयार करतात. ‘नाडियादवाला ग्रँडसन्स’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटासाठी रोहित धवन आणि वरुण धवन या दोन भावांनी अशाच काहीशा लहानपणीच्या गोष्टी एकत्र करून आणल्या असाव्यात इतक्या बाळबोध पद्धतीने चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपलं मनोरंजन करतो.
‘ढिश्शूम’ या नावातच इतका बाळबोधपणा आहे की एखाद्या अ‍ॅक्शनपटाला असं विनोदी नाव द्यावं.. चित्रपटाच्या सुरुवातीलाच पडद्यावर जॉन अब्राहम आणि वरुण धवन यांना नाचत-गात ‘ढिश्शूम’चा अर्थ सांगताना पाहिल्यावर देशभक्तीपासून मस्तीपर्यंत अनेक विनोदी कारणं त्यांच्याकडे आहेत याचा साक्षात्कार आपल्याला होतो. त्यांचं गाणं संपल्यावर कु ठेतरी मध्य आशियात.. असं ते सांगतात आणि मग एका जिगरबाज भारतीय क्रिकेटपटूचं विराज शर्मा (साकीब सलीम) अपहरण होतं. त्याच्या अपहरणाभोवती ही कथा फिरते. भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम सामन्यासाठी दोन दिवस उरलेले असताना या क्रिकेटपटूचं अपहरण होतं. आपल्या खेळाडूला शोधण्यासाठी भारताकडून कबीर शेरगिल (जॉन अब्राहम) हा स्पेशल टास्क ऑफिसर तिथे दाखल होतो. त्याला मदत करण्यासाठी मध्य आशियातच कुठेतरी पोलीस सेवेत असलेल्या जुनैद अन्सारीची (वरुण धवन) निवड खुद्द कबीरच करतो. आणि मग कबीर-जुनैद जोडी चित्रपटभर ढिश्शूम-ढिश्शूम करत अखेर त्या खेळाडूला शोधून काढून त्याला अंतिम सामन्यासाठी थेट मैदानात उतरवते.
या चित्रपटाची गंमत त्याच्या कथेत नाही. राकट शरीराचा आणि मनाचा एक हिरो आणि त्याच्या जोडीला थोडासा विनोदी पण हाणामारीही करू शकेल असा दुसरा हिरो ही दोन बंधूंची जोडी हा हॉलीवूड आणि बॉलीवूड दोन्हीकडचा यशस्वी फॉम्र्युला ‘ढिश्शूम’मध्ये वापरला आहे. इथे तो जॉन आणि वरुण जोडीने सार्थही ठरवला आहे. त्यांना कंपनी म्हणून इशिकाची (जॅकलिन फर्नाडिस) साथ आहे. खलनायकांच्या बाबतीत ट्विस्टही आहे. मध्य आशियातली दोन राज्यं पिंजून काढून हा खलनायक सापडतो. डोंगर पोखरून उंदीर काढावा या पद्धतीप्रमाणे कथेच्या सुरुवातीलाच भारत-पाकिस्तानमधील दरीचा वापर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात हे सगळं का घडतं हे पडद्यावर पाहणंच योग्य आहे कारण तेवढंही कळलं तर चित्रपटात काहीच शिल्लक राहणार नाही. जॉन आणि वरुण जोडीने खरोखरच चित्रपटात गंमत आणली आहे. या दोघांमधील खटकेबाज संवाद, जॉनला काही प्रसंगात का होईना चेहरा ताणून हसण्याचा व्यायाम दिला असल्याने त्याचा एकच एक चेहरा पाहण्याचा दुर्धर प्रसंग आपल्यावर ओढवत नाही. जॅकलिनला दिलेलं कामही तिने नीटनेटकं निभावलं आहे. आणि या कथेत उगाचच दोन्ही हिरोंसाठी प्रेमकथा आणून नायक-नायिका फॉम्र्युल्यात वेळ घालवला नसल्याने दिग्दर्शकाचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. दिग्दर्शक म्हणून रोहित धवनने आपल्या वडिलांचा विनोदी चित्रपटांचा वारसा नेटाने पुढे चालवल्यासारखे काही प्रसंग उत्तम रंगवले आहेत. अक्षय कुमारला वेगळ्याच अवतारात समोर आणून केलेला विनोद, त्याच प्रसंगात जॉनच्या ‘दोस्ताना’ चित्रपटातील गाण्याचा वापर, सतीश कौशिक यांच्या आवाजातील फोन आणि अशा काही अचानकपणे समोर येणाऱ्या गोष्टींनी चित्रपटात वेगळेपणा आणला आहे. अक्षय खन्नाला इतक्या गॅपनंतर पाहताना चांगले वाटते मात्र त्याच्या वाटय़ाला फार महत्त्वाची भूमिका आलेली नाही. चित्रपटातील दोन गाणी सुरुवातीला आणि शेवटी येतात. त्यामुळे मध्ये मध्ये त्याचाही भडिमार नाही. बाळबोध पद्धतीने का होईना ‘ढिश्शूम’ काही प्रमाणात आपले मनोरंजन नक्कीच करतो.

ढिश्शूम
निर्माता – साजिद नाडियादवाला
दिग्दर्शक – रोहित धवन
कलाकार जॉन अब्राहम, वरुण धवन, जॅकलिन फर्नाडिस, अक्षय कुमार, साकीब सलीम, नर्गिस फाखरी, मुकुल देव, अक्षय खन्ना.
संगीत – प्रीतम