चित्रपटांच्या बाबतीत शेक्सपिअरच्या थाटात नावात काय आहे, असा प्रश्न विचारून चालत नाही. कारण चित्रपटाच्या नावातच सगळे काही असते हे कोणताही निर्माता-दिग्दर्शक ठासून सांगेल. चित्रपटाचे नाव अथवा शीर्षक हे त्या चित्रपटाची जनमानसावर पहिली छाप पाडण्यास कारणीभूत ठरते. शीर्षकावरूनच चित्रपटाची कथा, चित्रपटाचा आशय याबाबत प्रेक्षक विचार करू लागतात. सध्या दोन चित्रपट एकाच नावावरून वादात अडकले आहेत. असे वाद इंडस्ट्रीला नवीन नाहीत. मात्र या नव्या वादांच्या निमित्ताने चित्रपटाच्या नावांवरून सतत होत असलेल्या वादांची ही उजळणी..

अनिल कपूरची निर्मिती असलेला व सोनम कपूर, करीना कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘वीरे दि वेडिंग’ हा चित्रपट चित्रीकरणाआधीपासून चर्चेत आहे. तर जिमी शेरगिलची मुख्य भूमिका असलेला ‘वीरे की वेडिंग’ हा पंजाबी चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर असून नामसाधम्र्यामुळे वाद सुरू झाला आहे. अनिल कपूर यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘वीरे की वेडिंग’ या शीर्षकामुळे सोनमच्या चित्रपटावर परिणाम होईल. त्या नावाचे पहिलेपण निघून जायचा धोका आहे. तर त्यांच्या या म्हणण्यात तथ्य नसून दोन्ही चित्रपटांमधील वेगळी कथा, भूमिका व अभिनेते पाहता दोन्ही चित्रपटांना एकमेकांच्या प्रसिद्धी व आíथक कमाईचा अजिबात धोका नसल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘इम्पा’नेही (इंडियन मोशन पिक्चर असोसिएश) यावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयाने अनिल कपूर यांना मात्र धक्का बसला आहे. पण चित्रपटाच्या नावावरून होणारे वाद नवीन नाहीत. कधी ते न्यायालयात सुटतात तर कधी ‘इम्पा’सारख्या संस्थांच्या मध्यस्थीने सुटतात.

याआधीही अनिल कपूर यांच्या ‘शॉर्टकट द कॉन इज ऑन’ या चित्रपटावरून बिक्रमजीत सिंग आणि अनिल कपूर यांच्यात वाद झाला होता. अनिल कपूर यांचा हा चित्रपट तितकासा बॉक्स ऑफिसवर चालला नाही, ना त्याची इतकी प्रसिद्धी झाली. त्यामुळे हा किस्सा फारसा माहिती नाही. यश राज फिल्म्सचा ‘थोडा प्यार थोडा मॅजिक ’ हा चित्रपट साहिल चढ्ढाच्या ‘थोडा लाइफ थोडा मॅजिक’ या शीर्षकाशी मेळ खात असल्याने ‘इम्पा’कडे सुनावणीसाठी गेला होता, पण या दोन्ही सिनेमांच्या शीर्षकात काहीही बदल न होता हे सिनेमे प्रदíशत झाले. प्रसिद्ध आणि सुपरडुपर हिट ‘शोले’ चित्रपट आणि ‘रामगोपाल वर्मा के शोले’ यांची कथा थोडी वेगळी आणि विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. ‘शोले’ हा चित्रपट प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचलेला अजरामर चित्रपट. या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा फायदा अर्थातच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटाला झाला असता. राम गोपाल वर्मा यांनी केवळ चित्रपटाचे नावच नव्हे तर चित्रपटातील पात्रांना असलेली नावे जशीच्या तशी वापरली होती. त्यामुळे ‘शोले’चे मूळ निर्माते जी. पी. सिप्पी यांचा नातू शस्चा सिप्पी याने कॉपीराइट व ट्रेडमार्कचे उल्लंघन याविरोधात तक्रार दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांना चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचे आदेश दिले. चित्रपटाचे नाव ‘राम गोपाल वर्मा के शोले’ असे झाले.

चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील ही छोटी-मोठी उदाहरणे आहेत. त्याचप्रकारे सध्या मराठीतही एका सिनेमाच्या शीर्षकाचा वाद गाजतो आहे. ‘रुबिक क्युब’ या नावाने निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाचे नाव हेच मुळात ‘रुबिक क्युब’ नावाचे बौद्धिक क्षमतेस चालना देणाऱ्या खेळण्यांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीने या चित्रपटाच्या नावाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर उच्च न्यायालयाने र्निबध आणले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या नावात थोडाफार बदल करून तो प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील शीर्षकाचा घोळही समोर आला आहे.

चित्रपटाचे शीर्षक हे निर्माते आणि दिग्दर्शकासह सर्व टीमसाठी महत्त्वाचे असते. मात्र त्यावरून कधी कधी अनपेक्षित असे वादविवादही उद्भवतात. जसे ‘उडता पंजाब’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद उद्भवला होता. या चित्रपटात पंजाबमधील मादक पदार्थाच्या विळख्यात अडक लेल्या तरुण पिढीच्या वास्तवावर प्रकाश टाकण्यात आला होता. या शीर्षकातले ‘पंजाब’ हे राज्याचे नाव काढून टाकावे असा सेन्सॉर बोर्डाचा आग्रह होता. पंजाब सरकारनेही ती मागणी केली होती, परंतु चित्रपट त्याच्या मूळ शीर्षकासह प्रदíशत झाला.

‘गोलीयों की रासलीला रामलीला’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनही दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या शीर्षकातून कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचे त्यांनी सांगूनही त्यांना त्यांच्या चित्रपटाच्या शीर्षकात गोलिया हा शब्द वापरावा लागला. ‘बिल्लू बार्बर’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून न्हावी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांनीही त्या नावाला आक्षेप घेतला होता. या वादविवादांमुळे काही वेळा चित्रपटाला प्रसिद्धी मिळते तर काही वेळा चित्रपटाच्या गल्ल्यावर व प्रसिद्धीवर त्याचा विपरीत परिणामही होतो. यातून चांगल्या कलाकृतीची गळचेपीही होते. अनेकदा काही निर्माते, दिग्दर्शक प्रसिद्ध चित्रपटाच्या शीर्षकाचा फायदा घेत त्यावर आपल्या चित्रपटाचे इमले रचतात. चित्रपटाचे शीर्षक रीतसर नोंदणी करणाऱ्या ‘इम्पा’सारख्या संस्था असूनही असे अनेक वाद सातत्याने होतात. मात्र यावर एकच एक ठोस उपाय या संस्थांकडेही नाहीत. त्यामुळे कायदेशील लढाईनेच या समस्येवरचा उपाय शोधावा लागतो.

कथानकांचे वाद

अनेकदा शीर्षकच काय कथानकांवरूनही अनेक वाद उद्भवले आहेत. त्यातील ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाचा गाजलेला वाद अजूनही सिनेरसिकांच्या स्मरणात असेल. लेखक चेतन भगत यांच्या ‘फाइव्ह पॉइंट समवन’ या पुस्तकावरून हे कथानक जवळजवळ ७० टक्के उचलल्याचा आरोप भगत यांनी केला होता. त्यासाठी श्रेयनामावलीत नाव न टाकल्याबद्दल भावना दुखावल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यावर निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी, पुस्तकाचा आधार घेतला असला तरी पूर्ण कथा पुस्तकावर बेतलेली नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

चित्रपटाच्या कथांवर अथवा शीर्षकांवर हक्क मिळवण्याची प्रक्रिया ही दिल्ली येथून केली जाते. ‘इम्पा’ त्यासाठी माध्यम म्हणून काम बघते. ‘वीरे की वेडिंग’ व ‘वीरे दी वेडिंग’च्या वादात न्यायालयाने ‘वीरे की वेडिंग’ या चित्रपटाच्या बाजूने न्याय दिला आहे आणि तो योग्यच आहे.

अनिल नागराज, सरचिटणीस, इम्पा