दिवाळीची चाहूल ही एक महिन्या आधीपासून लागते. घराघरांमध्ये फराळाच्या पदार्थांचे खमंग वास येतात, दिवाळीसाठी कंदील, पणत्या, तोरणं यांची खरेदी सुरु होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय होऊन जाते. दिवाळीच्या दिवशी दिव्यांच्या असंख्य ओळी घरात लावल्या जातात. खासकरून लहान मुलांची दिवाळीत धामधूम असते. किल्ले तयार करणे, दिवसभर फटाके फोडणे या लहानपणीच्या आठवणी घेऊनच आपण सगळे मोठे झालेलो असतो. प्रत्येकाचा दिवाळीतील एक दिवस आवडीचा असतो. याचबद्दल काही कलाकार सांगत आहेत त्यांच्या या दिवाळी विशेष सदरामध्ये….

सेलिब्रिटी रेसिपी : करंज्यांना मिळाला फुलवाचा टच

‘देविका’ म्हणजेच जुई माझ्यासाठी दिवाळीतला चिवडा – तितिक्षा तावडे
दिवाळीचा सण म्हणजे कंदील, चहू बाजूला प्रकाश, पणत्या, रांगोळी सगळीकडे प्रसन्न वातावरण असते. या सगळ्यामध्ये सगळ्यांचीच आवडती गोष्ट म्हणजे फराळ. फराळामध्ये मला चकली खूपच आवडते.

मला लहानपणापासून दिवाळीचा पहिला दिवस खूपच आवडतो. सर्वजण एकत्र येऊन फराळ करतात, फटाके उडवतात, नवीन कपडे, गप्पा गोष्टी करतात हे सगळंच मला खूप आवडत. पण आता विचाराल तर मला दिवाळीचा आदला दिवस खूप आवडतो त्याच कारण असं की, खूप खरेदी करायला मिळते घरच्यांसाठी, स्वत:साठी. घराची साफ-सफाई हे सगळं एक दिवस आधी होते त्यामुळे मला आदला दिवस आता जास्त आवडतो.

सेटवर माझी आणि जुईची आता खूप चांगली मैत्री झाली आहे. मी तिला चिवड्याची उपमा देईन सगळ्या चवी एकत्र … थोडीशी गोड, तिखट, नमकीन अश्या स्वभावाची.

VIDEO : ..म्हणून प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली डोसा विकण्याची वेळ!

सरस्वती म्हणजे तितिक्षा माझ्यासाठी रव्याचा लाडू- जुई गडकरी
दिवाळी म्हटलं की मला सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीची वाट मी फराळासाठीच बघते, असं म्हणायला हरकत नाही. फराळामधला आईच्या हातचा चिवडा आणि चकली मला खूप आवडतात. लहानपणापासून मला दिवाळसणामध्ये भाऊबीज जास्त जवळची वाटते. आमचं एकत्र कुटुंब आहे त्यामुळे या दिवशी आम्ही सगळी भावंडे मिळून खूप मजा करतो. माझी बहीण भावना हिच्यावर माझा खूप जीव आहे त्यामुळे हा दिवस माझ्या नेहमीच जवळ राहील. भेटवस्तूपेक्षा या दिवशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि अनमोल आहे.

तितिक्षा माझ्यासाठी रव्याचा लाडू आहे… स्वभावाने गोड, वरून कडक वाटली तर क्षणार्धात विरघळणारी आणि सगळ्यांना आवडेल अशी!