एआयबी कॉमेडियन तन्मय भटने भारतरत्न लता मंगशेकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर केलेल्या व्हिडिओमुळे सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया उमटल्या. या संपूर्ण प्रकारावर गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपले मौन सोडले आहे. स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार लता मंगेशकर म्हणाल्या की, मी हा व्हिडिओ पाहिलेला नाही आणि तो मला बघण्याची इच्छा देखील नाही. तसेच त्यांनी सांगितले की, मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. आणि महत्वाचं म्हणजे तन्मय भट कोण आहे? मी त्याला ओळखतही नाही. दरम्यान, चित्रफितीमध्ये भारतरत्न लता मंगेशकर आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे चेहरे मॉर्फ करीत त्यांच्या तोंडी अश्लील भाषा घालणाऱ्या तन्मयविरोधात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे ट्विटरवर तन्मयवर टीका होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप या राजकीय पक्षांनी तन्मयवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.