८० आणि ९० च्या दशकात भारतीय प्रेक्षकांच्या मनावर कोणी अधिराज्य गाजवलं असेल तर ते म्हणजे दूरदर्शनने. मग त्या बातम्या असो किंवा मालिका दूरदर्शनशिवाय तेव्हा कोणताच पर्याय नव्हता.
महाभारत, रामायण, अलिफ लैला, हमलोग, ब्योमकेश बक्शी, बुनियाद यांसारख्या एकापेक्षा एक सरस मालिका दूरदर्शनने दिल्या. त्याकाळात दूरदर्शनमध्ये काम करणं हीच मोठी गोष्ट होती. त्यात जर केलेल्या कामाचा दाम मिळाला तर सोने पे सुहागाच.
पण, प्रत्येक गोष्टीला जसे अपवाद असतात तसंच यालाही आहेच. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या बुनियाद या मालिकेसाठी त्यांना आजपर्यंत एक रुपयाही देण्यात आला नाही.
१९८६ मध्ये सुरू झालेली ही मालिका तुफान गाजली होती. दिवसातून ६ वेळा या मालिकेचं पूर्नः प्रक्षेपण दाखवले जायचे. ९३ टक्क्यांहून अधिक प्रेक्षकांची या मालिकेला पसंती होती. असे असूनसुद्धा दूरदर्शन रमेश सिप्पी यांचं मानधन देण्यात सपशेल अपयशी ठरलं.
प्रसार भारतीचे सीईओ जव्हार सरकार यांनी इकोनॉमिक्स टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार असे सांगितले की, “आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. यात नक्की काय झाले याची संपूर्ण माहिती कळली पाहिजे. जे घडले ते दुर्दैवीच आहे.”
“सिप्पींना त्यांच्या मालिकेच्या मानधनासाठी एवढी वर्ष झगडावं लागलं हे खरंतर दुर्दैवीच आहे,” असे ते पूढे म्हणाले.
“आतापर्यंत ४६ लाख रुपये त्यांना देण्याचं मान्य झालं आहे. याशिवाय त्यांचं मानधन द्यायला नेमकी एवढा वेळ का लागला? याला नक्की कोण जबाबदार आहे याचा ही आम्ही शोध घेत आहोत.”
बुनियादचे दिग्दर्शक म्हणून रमेश सिप्पी आणि ज्योती सरुप यांनी काम पाहिलं होतं. तर मनोहर जोशी हे या मालिकेचे लेखक होते.