युवा रंगकर्मीच्या नाटय़प्रतिभेला व्यासपीठ निर्माण करून देतात त्या एकांकिका स्पर्धा. अगदी महाविद्यालयीन पातळी ते खुल्या गटासाठीच्या एकांकिका स्पर्धाचा यात समावेश होतो. जसा पावसाळा, उन्हाळ्याचा मोसम असतो, तसाच एकांकिका स्पध्रेचाही मोसम असतो. हा मोसम आता सुरू झाला आहे. पुढचे जवळपास दोन महिने विविध एकांकिका स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धातून तरुणाईचा नाटय़जल्लोष होईल, नव्या कलाकारांना मंच मिळेल. मात्र, या स्पर्धातून गिमिक्स बाजूला ठेवून, स्पध्रेची चाकोरी मोडून वेगळा आशय-विषय मांडणारं काही समोर येईल का, याची प्रतीक्षा आहे.

पुण्यातल्या एकांकिका मोसमाची सुरुवात होते, ती पुरुषोत्तम करंडक स्पध्रेनं. नुकतीच पुरुषोत्तमची प्राथमिक फेरी झाली आहे. आता ९ आणि १० सप्टेंबरला अंतिम फेरी होईल. त्यानंतर पुढचे जवळपास दोन महिन्यांमध्ये बऱ्याच एकांकिका स्पर्धा होणार आहेत. त्यात भरत करंडक, विनोदोत्तम करंडक, दाजीकाका गाडगीळ करंडक, पिंपरी-चिंचवड येथे गडकरी करंडक, पृथ्वी थिएटर्सच्या थेस्पोची प्राथमिक फेरी, एक्स्प्रेशन लॅबतर्फे नव्याने आयोजित होत असलेली सायफाय करंडक या स्पर्धाचा समावेश आहे. त्याशिवाय काही राजकीय पक्षांच्या एकांकिका स्पर्धा होतील, त्या वेगळ्याच.

या शिवाय युवा रंगकर्मीचं लक्ष असतं, ते सवाई करंडकावर! ‘सवाई’साठी पात्र होण्यासाठी रंगकर्मी जीवाचं रान करतात. अनेकदा ‘पुरुषोत्तम’मध्येच केलेली एकांकिका बाकी स्पर्धामध्ये फिरवली जाते. तसंच काही संस्था तीन-चार एकांकिका एकत्र करून त्याचेही स्वतंत्रपणे प्रयोग करतात. या सर्व स्पर्धा आणि त्याच्या तयारीसाठी पुण्यातील युवा रंगकर्मी व्यग्र झाले आहेत.

एकांकिका स्पर्धा हा युवा रंगकर्मीच्या नाटय़गुणांना व्यासपीठ देणारा मंच आहे. मात्र, अनेकदा या मंचाचा हवा तसा वापर होत नाही. केवळ पारितोषिक मिळवणं, जिंकणं एवढाच हेतू त्यात असतो. एकांकिका स्पध्रेकडे प्रयोगशाळा म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. नवं काही करता येतंय का, नवा आशय-विषय मांडता येतो का, हे एकांकिकांमधून होण्याची गरज आहे. पारितोषिक आणि जिंकणंही महत्त्वाचं आहे. पण केवळ तेवढय़ापुरतीच एकांकिका राहू नये.

रंगमंचीय अवकाशात जितके जास्त प्रयोग करता येतील, तितका जास्त सर्जनशील आविष्कार करता येईल. तसंच रंगभूमीच्या नव्या शक्यता शोधण्याचा प्रयत्नही या एकांकिकांमधून व्हावा, ही अपेक्षा आहे. एकांकिका स्पध्रेच्या या मोसमात नवं काही हाती गवसलं, तर ते खऱ्या अर्थानं आनंददायी ठरेल.

chinmay.reporter@gmail.com