नव्या काळाचं नाटक घडवण्यासाठी सायफाय करंडक ही अनोखी नाटय़स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पध्रेत माहिती तंत्रज्ञानावर म्हणजेच सायबर फिक्शनवर आधारित नाटय़कृती सादर होणार आहेत.

साहित्य-चित्रपटांमध्ये सायफाय अर्थात सायन्स फिक्शन म्हणजेच विज्ञानातील अद्भुतरम्यकथा हा प्रकार प्रसिद्ध आहे. मात्र, सायफाय या शब्दाचा नवा अर्थ आता रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. रंगकर्मी प्रदीप वैद्य त्यांच्या ‘एक्स्प्रेशन लॅब या संस्थेच्या माध्यमातून सायफाय करंडक ही स्पर्धा आयोजित करत आहेत. या स्पध्रेत सायफाय म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील कथांवर आधारित नाटय़कृती सादर करावयाच्या आहेत.

नव्या काळाचं नवं नाटक घडण्यासाठीचा नवा प्रयोग ठरणार आहे. प्रसंगनाटय़ सादरीकरणातून अंतिम फेरीसाठी संघ निवड हे स्पध्रेचं वैशिष्टय़ आहे.

क्विकहिल फाऊंडेशन आणि एक्स्प्रेशन लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या धर्तीवर ही स्पर्धा होणार आहे. स्पध्रेच्या प्राथमिक फेरीत कमीतकमी साहित्यासह प्रसंगनाटय़ सादर करावं लागणार आहे. अर्धा तास आधी संघाला विषय दिला जाईल. या सादरीकरणातील रसरशीतपणा आणि अंत:स्फूर्तीच्या आधारावर अंतिम फेरीसाठी ३० संघांची निवड केली जाणार आहे. पुढे एका मार्गदर्शकासह तीन महिने तयारी करण्यासाठी वेळ दिला जाईल आणि त्यानंतर अंतिम फेरी होईल. प्राथमिक फेरीतील प्रसंगनाटय़ कोणत्याही विषयावर असू शकतात, मात्र अंतिम फेरीतल्या एकांकिका या सायबर याच विषयावर आधारित असतील. या स्पध्रेतील एकांकिकांतून सायबर अर्थात माहिती तंत्रज्ञानाचा विविध अंगांनी मानवी जीवनावर होणारा सकारात्मक-नकारात्मक परिणाम दिसणार आहे. त्याशिवाय नव्या जाणिवांच्या नव्या एकांकिका लिहिल्या जातील.

नवे लेखक गवसण्यासाठीही ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

प्रसंगनाटय़ हा नाटक घडण्यासाठीचा महत्त्वाचा घटक. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रसंगनाटय़ हा प्रकार काहीसा बाजूला पडला आहे. या स्पध्रेतून हा प्रकार पुनरुज्जीवित व्हावा, ढिगानं होणाऱ्या एकांकिका स्पर्धामध्ये आलेला तोचतोचपणा जाऊन नवं, रसरशीत नाटय़ अनुभवायला मिळावं आणि नाटक करणं सहजसोपं व्हावं हादेखील हेतू आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी एकत्र येऊन आजच्या काळाशी नातं सांगणारं नाटक घडवावं असा प्रयत्न आहे. या स्पध्रेत मराठी िहदी आणि इंग्रजी एकांकिका सादर करता येणार आहेत. स्पध्रेची प्राथमिक फेरी ६ ते १५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. अंतिम फेरी आणि महोत्सव २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विजेत्यांना रोख रकमेचं पारितोषिकही मिळणार आहे. या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे.

सायफाय करंडक या अनोख्या संकल्पनेविषयी एक्स्प्रेशन लॅबचे संचालक आणि रंगकर्मी प्रदीप वैद्य यांनी ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. मराठी नाटक साचेबद्ध झालं आहे. रंगभूमीवर नवीन काही घडत नाही याची नेहमी चर्चा केली जाते. या पाश्र्वभूमीवर, नव्या काळातले नवे विषय रंगमंचावर येण्यासाठी सायफाय करंडक हा एक प्रयत्न आहे. सायबर अर्थात माहिती तंत्रज्ञान हा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे याच विषयाला घेऊन नाटय़कृती निर्माण होऊ शकतात, या विचारातून सायफाय करंडक स्पध्रेची संकल्पना पुढे आली. यापूर्वी तीन र्वष आयटी करंडक एकांकिका स्पर्धाही घेतली होती. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत होता, मात्र त्या पलीकडे जाऊन नव्या काळाचे नाटक घडण्यासाठी सायफाय करंडक स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. या स्पध्रेतून नवे आकृतिबंध सापडतील, नवे विषय रंगमंचावर येतील आणि नव्या काळाचं नाटक घडेल अशी अपेक्षा आहे, असे वैद्य यांनी सांगितले.

अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क : ९८२२०५९४२९