सावित्रीबाई फुले नाटय़गृह वादाचा नवा अंक

शहराबाहेर असल्याने प्रवासाच्या दृष्टीने होणारी गैरसोय आणि अवाजवी भाडेदर, मेजवान्या अशा विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात सप्टेंबर महिन्यात अवघ्या तीन तारखा नाटकांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. महिन्यातील १६ दिवस व्यावसायिक नाटय़निर्मात्यांसाठी राखून ठेवणे बंधनकारक असताना नाटय़गृह व्यवस्थापनाने हा नियम धाब्यावर बसवला आहे. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर डागडुजीच्या कारणांमुळे बंद असताना फुले नाटय़गृहातही नाटय़प्रयोगांना तारखा मिळत नसल्याने रसिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

सर्वसाधारणपणे शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळ, दुपार आणि संध्याकाळचे सत्र निर्मात्यांसाठी ठेवण्यात येते. मात्र सावित्रीबाई फुले व्यवस्थापनाने हा संकेत धुळीस मिळविला आहे. नाटय़ निर्मात्यांप्रमाणेच डोंबिवलीतील संस्थांचे प्रतिनिधीही विविध कार्यक्रमांसाठी सावित्रीबाई फुले नाटय़गृहाच्या शनिवार-रविवारच्या तारखा मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र त्यांना त्या तारखा नाटय़ निर्मात्यांसाठी राखीव असल्याचा नियम सांगितला जातो. मग सावित्रीबाई फुले नाटय़गृह शनिवार आणि रविवारी नेमके कुणासाठी आरक्षित असते, असा प्रश्न उपस्थित होतो. नाटय़गृह व्यवस्थापन शनिवार-रविवारच्या तारखांचा काळाबाजार तर करीत नाही ना, अशी शंका नाटय़प्रेमी मंडळी व्यक्त करू लागले आहेत. यासंदर्भात नाटय़गृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. सप्टेंबर महिन्यात निर्मात्यांना देण्यात आलेल्या तारखांमध्ये ९ सप्टेंबर नव्हती. तरीही आयत्यावेळी तो दिवस ‘सही रे सही’ नाटय़ प्रयोगासाठी कसा देण्यात आला, असा सवाल निर्माते धनंजय चाळके यांनी उपस्थित केला आहे. नाटय़गृहाचे विद्यमान व्यवस्थापक निर्मार्त्यांशी संवाद साधण्यास अनुत्सुक असतात. काही विचारले तरी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी निर्मात्यांनी केली आहे.

सावित्रीबाई फुले नाटय़गृहाविषयी बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. लवकरच त्याची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवली.