कवितांचा निखळ आस्वाद घेण्यासाठी लागणारी उत्कट, तरल संवेदनशीलता आणि त्याकरता आवश्यक ते निवांतपण आज आपल्या तथाकथित ‘प्रगती’च्या जीवघेण्या पाठलागात किंचित तरी उरलेय का, असा प्रश्न कधी कधी पडतो. मुक्कामाचं ठिकाण माहीत नसलेल्या ठिकाणी पोचण्यासाठी आपण अखंड उरी फुटेस्तो धावतो आहोत. तसे धावलो नाही तर आपण संपून जाऊ असं आपल्याला वाटतंय. पण या कधीच न संपणाऱ्या रेसमध्ये आयुष्य ‘जगायचं’ मात्र आपण साफ विसरून गेलो आहोत. ‘उद्या’ची भीती, अस्थैर्य आणि वखवख यांच्या कह्य़ात गेलेले आपण आता आपले राहिलेलोच नाही. एक भीषण तुटलेपण, अनामिक भीती आणि न संपणारा हव्यास यांनी आपल्याला घेरलं आहे. म्हटलं तर सर्व सुखसुविधा आज आपल्यासमोर हात जोडून उभ्या आहेत. पण त्यांचा आनंद घेण्यासाठी, त्यातलं सुख अनुभवण्यासाठी लागणारी मनाची स्वस्थता अन् निर्भर वृत्तीच आपल्यापाशी उरलेली नाही. सुख ओरबाडण्यानं ते लाभत नाही. ते अनुभवण्यासाठी मानसिक, भावनिक (आणि शारीरिकही!) संवेदनशीलता तुमच्यात शिल्लक असावी लागते. आणि तीच मुळी आज हरवलीय. अशावेळी मुक्ता बर्वेसारखी एक संवेदनशील कलाकार संगीतकार, गायक आणि कवी(ही) असलेल्या मिलिंद जोशींसमवेत ‘रंग नवा..’ नावाचा कवितांचा आस्वादक कार्यक्रम सादर करते, तेव्हा आपली हरवलेली संवेदना पुन्हा एकदा नव्यानं जागृत होते. आपण कुठल्या भ्रमित (५ी१३४ं’) वास्तवात जगतो आहोत याची आपल्याला प्रकर्षांनं जाणीव होते. आणि त्यात किती वाहवत जायचं याचा गंभीरपणे विचार करण्याची हीच ती वेळ आहे, हे आपल्याला जाणवतं.     
एक काळ होता- जेव्हा पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई आरती प्रभू आणि बोरकरांच्या कविता सादर करीत आणि कवितांचे चाहते त्या तितक्याच हळुवारपणे आस्वादत असत. त्यासाठी लागणारं निवांतपण त्यांच्यापाशी होतं. माणसांची मनं प्रदूषित झाली नव्हती. त्यांचं निर्मळ ‘माणूस’पण शाबूत होतं. त्यामुळेच पु. ल. व सुनीताबाई कविता ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोचवू शकल्या. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आपण पराकोटीचे आत्मकेंद्री बनलो आहोत. सुखाची आपली व्याख्याच बदलली आहे. अर्थात सुखाची जी काही व्याख्या आपण स्वीकारली आहे, त्यानं तरी आपण सुखी झालो आहोत का, हा खरा प्रश्न आहे.
..तर अशा संवेदनाहीन आसमंतात ‘रंग नवा..’तल्या कविता आपल्याला झडझडून जाग आणतात. आपलं हरवलेलं भावविश्व आपल्याला पुन्हा सापडतं आणि पुनश्च खुणावू लागतं.
यातल्या बहुतांश कविता या बहुपरिचित नाहीत. क्वचित बहिणाबाई किंवा ना. धों. महानोरांची कविता याला अपवाद ठरावी. आरती प्रभू, सुरेश भट, कुसुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, सदानंद डबीर, सौमित्र, अशोक बागवे, दिलीप पांढरपट्टे, मिलिंद जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या कवितांची ही आनंदयात्रा आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. पाऊस, प्रेयसी, प्रेमभावना, एकाकीपण, आयुष्याबद्दलचं मुक्त चिंतन, निसर्गाचं गूढ तसंच मानवी भावभावना व्यक्त करणाऱ्या अशा विभिन्न बाजाच्या या कविता आहेत. त्यांना एकच एक सूत्र नाही. यातली कुसुमाग्रजांची ‘नट’ ही प्रयोग संपल्यानंतरची कलाकाराची भावावस्था चितारणारी कविता तिच्या वेगळेपणानं श्रोत्यांचं एकदम लक्ष वेधून घेते. मुक्ता ती इतक्या प्रत्ययकारीतेनं पेश करते, की त्यातलं कवितापण नजरेआड होऊन एका संवेदनशील कलाकाराचं उत्कट मनोगत कुठं सुरू होतं, हे कळतच नाही. मुक्ताच्या स्वत:च्या कविताही तरल अन् आवेगी आहेत. तिच्यातली कवयित्री किती सखोल आहे हे दर्शवणारी एक कविता.. वानगीदाखल :
तिनं आपल्या सावलीला सांगितलं,
‘‘जा, तू पण सुट्टी घे काही दिवस.
सतत धावत राहतेस माझ्याबरोबर.
कधी मागे, कधी पुढे.’’
आपल्या दोघांचाही जरा ओव्हर टाइम झालाय.
खरं सांगू, मला तुझ्याबरोबर असण्याचाही कंटाळा आलाय.
मी शोधतेय नवीन अवकाश, नवीन गती, चव, वास, रंग, फील..
क्षितीजही असेल नवं कदाचित.
आणि मग सूर्यही उगवेल नवा.
मग सावली कशी तीच राहील ना?
पण या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत.
म्हणून म्हटलं, जाऊ नकोस निघून. फक्त थोडी सुट्टी घे.
माझा शोध चालू आहे..‘रंग नवा..’ हा कवितांचा कार्यक्रम असला तरी त्याला रूढ अशी कुठली चौकट नाही. मित्रांशी सहज गप्पा मारता मारता आपण या विषयावरून त्या विषयाकडे कधी जातो, हे आपलं आपल्यालादेखील कळत नाही, तसंच या कार्यक्रमाचं आहे. त्यात एक वरपांगी सांगाडा (२३१४ू३४१ी) ठरला असला तरी दर कार्यक्रमात नवं नवं सुचेल तसं त्यात सामील होत जाणार आहे. म्हणजे ‘रंग नवा..’ला जसं कवितांच्या विषयांचं बंधन नाही, तसंच त्याचं सादरीकरणही बंदिस्त नाही. त्या- त्या वेळी जे सुचेल (कुणी सुचवेल), भावेल, घ्यावंसं वाटेल, ते- ते त्यात नव्यानं समाविष्ट होतं.. होत राहणार आहे. या अर्थानं हा प्रवाही कवितास्वाद असणार आहे. आणि हेच या कार्यक्रमाचं वेगळेपण आहे.
बरं, केवळ कविता सादरीकरणच नाही, तर कवितेची प्रसववेणा, कवितेमागची पाश्र्वभूमी, तीत अभिप्रेत भावार्थ आणि ती सादर करताना सादरकर्त्यांनं तिचा लावलेला अन्वय याचीही चर्चा ‘रंग नवा..’मध्ये होते. एवढंच नव्हे तर कवितांना चाल देताना त्यासंबंधात संगीतकारानं केलेला विचार, कवितेला संगीतात मुरवताना घडलेली सृजनप्रक्रिया, त्यातला विचार हेही उलगडून दाखवायचा प्रयत्न यात होतो. स्वत: मुक्ता बर्वे हिच्याही काही कविता यात पेश होतात. त्या कवितांची सृजनप्रक्रिया मुक्ता आपल्याशी शेअर करते. मिलिंद जोशी या कवितांना चाली लावतानाचे आपले अनुभव, ती प्रक्रिया कशी घडली, हे सर्वाना कळेल अशा सोप्या शब्दांत मांडतात. दोघांमधल्या या मुक्तगप्पा कविता आणि संगीत याबद्दलची जाण आणि भान श्रोत्यांमध्ये रुजवण्याकामी मोलाच्या आहेत. गप्पांचा हा प्रवासही औपचारिकतेच्या जोखडात बांधलेला नाही. या गप्पांमधली अकृत्रिमपण श्रोत्यांना आपलंसं करते.  
पावसावरची एक युगुलकविता तर आपल्या समक्षच साकार होते. अचानक आलेल्या पावसामुळे ‘ती’च्या छत्रीच्या आश्रयाला आलेल्या ‘त्या’ला आपलं तिच्यावरचं प्रेम व्यक्त करायची हीच योग्य वेळ आहे असं खूप खूप आतून वाटतं. पण तरी ते नेमकं कसं व्यक्त करावं, या संभ्रमात तो. मनातल्या कवितेत तो ते व्यक्त करतोही; पण मनातल्या मनातच. ‘ती’लाही त्याच्या मनातलं हे गुज कळलेलं आहे. कधी एकदा तो आपलं प्रेम व्यक्त करतो असं तिलाही झालंय. पण त्यानंच ते व्यक्त करायला हवं असं तिला वाटतं. ती मनातल्या मनात त्याला तसं सुचवतेही. पण.. तेवढय़ात पाऊस थांबतो. आणि ते व्यक्त करायचं राहूनच जातं. दोघांचंही! हा रोमॅंटिक कविताक्षण अप्रतिमरीत्या सादर होतो. प्रेमातली ती हुरहूर, ती अधीर उत्कटता, ते अवघडलेपण आणि ती द्विधा अवस्था.. मुक्ता बर्वे आणि मिलिंद जोशी यांनी अक्षरश: समूर्त केली आहे.
या कविता सादरीकरणाला पाश्र्वपडद्यावरील निसर्गाच्या नानाविध विभ्रमांचं एक आगळं दृश्यरूप लाभलेलं आहे. गहिरी.. एकट संध्याकाळ, पहाटेचं निरभ्र आभाळ, कुठं घनगर्द जंगलात हरवलेली एकांडी पायवाट, सागरलाटांची नितळ निळाई, दिगंतात झेपावणारे पाखरांचे थवे, एकाकी करकरीत दुपार. पावसाची तर अगणितच रूपं : धो-धो कोसळणारा. संथ, शांत, आपल्याच नादात रिमझिमणारा. बेभान धिंगाण्यानं झाडाझुडपांना जीव नकोसा करणारा. जलाशयात वलयांची नक्षी कोरणारा. आसुसलेल्या तृषार्त धरतीला अविरत कोसळून ओलंचिंब करत तिच्या कुशीत सृजनाचं बीज पेरणारा.. कवितेसोबत येणाऱ्या या निसर्गप्रतिमा सुंदर आहेत. परंतु त्याचबरोबर एक खंतही मनाला टोचते : हे कवितेचं अति सुलभीकरण तर नाही ना? चाहत्यागणिक अर्थाचे अगणित तरंग मनामनांत उमटविणाऱ्या कवितेला असं दृश्यरूपात बद्ध केल्यानं ती आक्रसत तर नाही?
इथं आणखीन एक गोष्ट उन्मेखून सांगायला हवी. मृत्यूच्या शाश्वततेवर शिक्कामोर्तब करणाऱ्या एका कवितेच्या सादरीकरणावेळी पाश्र्वपडद्यावरील खोल विहिरीत भगभगीत प्रकाशझोताचा एक तीव्र लोळ पडदा भेदून गायक मिलिंद जोशी यांच्या सिल्हौटी इफेक्टमधील प्रतिमेवर पडतो आणि फक्त त्यांच्या लालभडक कानांच्या पाळ्या तेवढय़ा प्रकाशमान होतात. मृत्यूकल्पनेचं मूर्त रूप त्यामुळे अक्षरश: अंगावर येतं. प्रकाशयोजनाकार भूषण देसाईंच्या या सर्जनाचं करावं तेवढं कौतुक थोडं. संगीत संयोजक ज्ञानेश देव यांनी कवितांच्या अधेमधे पेरलेले भावानुकूल संगीततुकडेही वातावरणनिर्मितीत योगदान देतात.
 मिलिंद जोशी यांनी यातल्या कवितांना दिलेल्या चाली काहीशा वेगळ्या आहेत. नेहमीच्या भावकवितांचा निनाद त्यात नाही. यातल्या काहींना आपला असा वास आहे. वेगळा रंग आहे.. चव आहे. त्यामुळे त्या लक्ष वेधून घेतात. तथापि त्यांच्या काही चालींची अनवटता अंगवळणी पडायला थोडा वेळ लागेल. पण प्रत्येक चालीमागे त्यांचा काहीएक विचार आहे. सुरेश भटांच्या एका गझलेला त्यांनी दिलेली अरेबिक फोडणी मात्र गझलेतली नाजूकता संपवणारी आहे. ‘प्रयोगासाठी प्रयोग’ करणं हे काही खरं नव्हे. गायक मिलिंद जोशी आणि मनिषा जोशी यांनी कवितांची ‘गाणी’ सुरेल सादर केली आहेत. कवितांमधलं कवितापण त्यामुळे उठावदार झालं आहे. सगळ्या संगीत साथीदारांची साथही तितकीच मोलाची आहे.
कवितांबद्दलचं कुतूहल जागवू पाहणारी ही अक्षर-मैफल संपली तरी घरी परतल्यावरही मनात ती दिडदा दिडदा करीतच राहते.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने