महाकवी कालिदास यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ या नाटकाचे तीन प्रयोग अमेरिकेत रंगणार आहेत. नाटकाचे दिग्दर्शक डॉ. प्रसाद भिडे यांच्यासह नाटकातील प्रमुख कलाकार आदित्य रानडे (कालिदास), सुप्रिया शेटे (राजकन्या), तनया गोरे (गणिका) हे अमेरिकेला नुकतेच रवाना झाले. अमेरिकेतील स्थानिक कलाकारांनाही नाटकाच्या प्रयोगात संधी देण्यात येणार आहे. ही प्रायोगिक सांगीतिका असून वॉशिंग्टन येथील मराठी कला मंडळाच्या निमंत्रणावरून ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ अमेरिकेत रंगणार आहे.

नाटकाचे लेखन मयूर देवल यांनी केले असून नाटकात ‘काली’ या गुराख्याचा ‘महाकवी कालिदास’ याच्यापर्यंतचा झालेला प्रवास मांडण्यात आला आहे. नाटकाचा पहिला प्रयोग शनिवारी (७ मे) व्हर्जिनिआ येथे झाला. रविवार, ८ मे रोजी मेरिलॅण्ड आणि १४ मे रोजी कोलंबस-इंडियाना येथे नाटकाचे उर्वरित दोन प्रयोग होणार आहेत.

महाकवी कालिदास यांचे भारतीय साहित्यात मोलाचे योगदान आहे. ‘मेघदूत’, ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ अशा खंडकाव्यांमधून कालिदास यांच्या प्रतिभेचे तसेच संस्कृती, अभिजात कला, सामाजिक जीवन यांचे दर्शन घडले आहे. या सांगीतिकेच्या माध्यमातून महाकवी कालिदास यांचे संपूर्ण जीवन उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषांत ही सांगीतिका सादर केली जाते. अमेरिकेच्या दौऱ्यात हे नाटक मराठीतून सादर केले जाणार आहे. कालिदासाच्या आयुष्यात घडलेले महत्त्वपूर्ण प्रसंग नाटकात सादर करण्यात आले आहेत.

या संदर्भात नाटकाचे दिग्दर्शक प्रा. डॉ. प्रसाद भिडे म्हणाले, अमेरिकेत प्रयोग करतोय त्यापेक्षा अमेरिकेत राहणाऱ्या लोकांसोबत प्रयोग करतोय याचे महत्त्व व अप्रूप जास्त आहे. त्यांची शब्द उच्चारायची पद्धत वेगळी आहे. त्यांना कळणारा वाक्याचा अर्थ वेगळा. यातून सुवर्णमध्य गाठून आम्ही काम करतोय. त्यांना समजेल आणि पटेल अशा भाषेत दिग्दर्शक म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांना समजावून सांगावी लागत आहे. आमचा चमू अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी नाटकात काम करणाऱ्या अमेरिकेतील कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगाची ध्वनिचित्रफीत पाहून त्याचा अभ्यास केला आहे.

नाटकाचे लेखक मयूर देवल यांनी सांगितले, गल्ला आणि गर्दी जमवू शकणाऱ्या प्रसिद्ध कलाकारांना न आणता हौशी आणि फारसा अनुभव नसलेल्या कलाकारांना घेऊन आम्ही हे नाटक करतो आहोत. व्यावसायिक आणि हौशी असा भेद मी मानत नाही. जीव ओतून काम करणारे व केवळ जीव जगवायला काम करणारे एवढे दोनच प्रकार कलाकारांचे असतात. माझ्या नाटकातील सर्व कलाकार जीव ओतून काम करणारे आहेत. त्यांनी माझ्या नाटकात जीव ओतला आहे. प्रसिद्ध कलाकारांना घेऊनही याचे प्रयोग करता आले असते, पण आम्ही तसे केलेले नाही.

‘एका गुरख्याचे महाकाव्य’ या नाटकाला महाराष्ट्र राज्य हौशी नाटय़ स्पर्धेत तीन लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. याच स्पर्धेत अन्य पारितोषिकेही नाटकाला मिळाली आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या राम गणेश गडकरी पुरस्कारासाठीही या नाटकाची निवड झाली होती. मुंबईत गेल्या ५ डिसेंबर रोजी नाटकाचा प्रयोग झाला होता.