बॉलीवूड चित्रपटांना सध्या वादांचे आणि बंदीचे ग्रहण लागले असतानाच निर्माती एकता कपूरने एक धाडसी पाऊल उचलले आहे. आगामी चित्रपटांसाठी कलाकारांशी करण्यात येणाऱ्या करारात तिने चक्क ‘न्युडिटी’च्या कलमाचा समावेश केला आहे. त्यानुसार, एकताच्या ‘एक्सएक्सएक्स’ या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना ‘न्युडिटी’च्या कलमाचा समावेश असलेल्या या करारावर स्वाक्षरी करावी लागेल. या चित्रपटाच्या पोस्टर्सची चर्चा आत्तापासूनच इंडस्ट्रीमध्ये रंगू लागली आहे. बोल्ड दृश्यांचा समावेश असल्याने एकताने कलाकारांशी करार करताना त्यामध्ये ‘न्युडिटी’च्या कलमाचा समावेश करण्याचे ठरवले. संबंधित कलाकाराने ऐनवेळी चित्रपटातील दृश्यांवर किंवा संवादांवर आक्षेप घेत काढता पाय घेऊ नये किंवा त्यामुळे चित्रीकरणादरम्यान कोणतीही तडजोड करायला लागू नये, यासाठी एकता कपूरने अशाप्रकारचा करार करण्याचे ठरविले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केन घोष यांनी खूप चर्चा करून हा तांत्रिक कायदा करारनाम्यात समाविष्ट केल्याचे सांगितले. या चित्रपटात एकुण पाच कथांचा समावेश असून या माध्यमातून शृंगाराचे विविध पैलू उलगडून दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे.