‘वीरे दी वेडींग’ सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. आता निर्माती एकता कपूरने या सिनेमात पैसा गुंतवायचा की नाही यावर पुनर्विचार करणार असल्याचे सांगितले.

‘मी ‘वीरे दी वेडींग’ या सिनेमावर पैसा गुंतवणार आहे की नाही हे अजून मलाच माहित नाही. मी अद्याप कोणत्याही निर्णयावर पोहोचले नाही. एक निर्माती म्हणून मला अशा सिनेमांमध्ये पैसा गुंतवायचा आहे जो पाहायला प्रेक्षक उत्सुक असतील. प्रेक्षक जर तिकीटावर २०० रुपये खर्च करणार असतील तर त्यांची अपेक्षा ही उत्तम सिनेमाचीच असणार. त्यामुळे उत्तम संहिता असलेल्या सिनेमांमध्ये मला गुंतवणूक करायची आहे. शेवटी माझ्यासाठी हा एक व्यवहारच आहे,’ असे मत एकताने व्यक्त केले आहे.

सोनम कपूर आणि करिना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वीरे दी वेडींग’ सिनेमात स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शशांक घोष करणार असून, सोनमची बहिण रिया कपूर या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतेय. गेल्या वर्षी या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार होती. पण त्यावेळी करिना गरोदर असल्यामुळे सिनेमाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. तैमुरच्या जन्मानंतरही करिनाने काही दिवस कामांमधून सुट्टी घेतली होती.

याशिवाय ‘वीरे दी वेडिंग’ या नावाबाबत अनिल कपूर यांनी इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनकडे (इम्पा) तक्रार नोंदवली होती. अनिल यांनी जिमी शेरगिल याच्या ‘वीरे की वेडिंग’ या सिनेमाविरोधात तक्रार नोंदवली होती. अनिल कपूर यांच्या म्हणण्यानुसार ‘वीरे दी वेडिंग’ हे टायटल आधीपासूनच त्यांच्या मुली सोनम आणि रिया कपूर यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी ‘वीरे की वेडिंग’ सिनेमाच्या निर्मात्यांना सिनेमाचे टायटल बदलण्यास सांगितले होते. पण सिनेमाचे निर्माते चंदन बख्शी यांनी टायटल बदलण्यास स्पष्ट नकार दिला होता.