सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरूवारी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याला समन्स बजावले. आयपीएलमधील शाहरूखच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून झालेल्या परकीय चलन कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी यापूर्वी शाहरूखला कारणे दाखवा, नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज शाहरूखला बजावण्यात आलेल्या समन्समध्ये येत्या २३ जुलैला त्याला ‘ईडी’समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाईट रायडर्स स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड (केआरएसपीएल) या संघाचे समभाग मॉरिशसमधील कंपनीला मूळ किंमतीपेक्षा कमी भावात विकण्यात आले होते. त्यामुळे कंपनीला तब्बल ७३.६ कोटी रूपयांचा तोटा झाला होता. याप्रकरणी मार्च महिन्यात ईडीने शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी खान, अभिनेत्री जुही चावला आणि अन्य काही जणांना या नुकसानासाठी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाची मालकी नाईट रायडर्स स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड (केआरएसपीएल) आहे.

सूत्रांच्या माहितीनूसार ‘ईडी’ला तपासणीदरम्यान समभाग विक्रीच्या या तब्बल १०० कोटींच्या व्यवहारात परकीय चलन कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. जय मेहता यांच्या मालकीच्या सी आईसलँड इन्व्हेस्टमेंट आणि कोलकाता नाईट रायडर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात हा व्यवहार झाला आहे. नाइट रायडर्स स्पोर्ट्स ही मॉरिशसमधील नोंदणीकृत कंपनी असून, तिची मालकी शाहरूखची रेड चिली कंपनी आणि अभिनेत्री जुही चावला व तिचा पती जय मेहता यांच्याकडे आहे. २००८-०९ मध्ये शाहरूखने या कंपनीचे काही समभाग आपल्याच भागीदाराला स्वस्तात विकले. एक समभाग ७० ते ८६ रुपयांना विकायला हवा होता, तो त्याने जय मेहताच्या सी आयलंड इन्व्हेस्टमेन्ट या कंपनीला दहा रुपयांना विकला. हा व्यवहार करताना जाणुनबुजून समभागांची किंमत कमी दाखवली गेल्याचा संशय आहे. या संपूर्ण व्यवहारात मोठ्याप्रमाणावर अनियमितता असून यामध्ये समभाग मुल्यांकनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचाही ‘ईडी’चा तर्क आहे. त्यामुळे २३ जुलैला शाहरूख खान ‘ईडी’समोर काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी ‘ईडी’ने गेल्या मे महिन्यात शाहरूखला समन्स पाठविले होते. तेव्हा तो उपस्थित न राहिल्याने ऑक्टोबरमध्ये पुन्हा समन्स पाठविण्यात आले. त्यामुळे येत्या २३ जुलैला शाहरूख ‘ईडी’समोर काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.