बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल आणि व्यावसायिक भरत तख्तानी यांच्या घरी नुकतेच छोट्या परीराणीचे आगमन झाले. ईशाने २० ऑक्टोबरला हिंदुजा रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. हेमा मालिनी यांनीही आपल्या नातीच्या जन्माचा आनंद ट्विटरवरून व्यक्त केला. खरंतर ईशाच्या मुलीच्या जन्माची बातमी कालच सर्वांसमोर आली. त्यामुळे तिच्या मुलीचा जन्म २३ ऑक्टोबरला झाल्याचे वृत्त होते. मात्र, हेमा मालिनी यांच्या ट्विटमुळे सर्व माहिती स्पष्ट झाली आहे.

वाचा : बॉलिवूडच्या ‘परफेक्ट’ संस्कारी अभिनेत्री

हेमा मालिनी यांनी ट्विटवर लिहिले की, ‘२० ऑक्टोबर हा दिवस आमच्यासाठी खास आणि अविस्मरणीय आहे. ईशाने त्या दिवशी सुंदर मुलीला जन्म दिला. माझा आनंद गगनात मावत नाहीये. आता घरी लक्ष्मी देवीचं आगमन होणार.’ दरम्यान, ईशा आणि भरत त्यांच्या तान्हुलीचे नाव काय ठेवणार याबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता होती. तर, या सेलिब्रिटी किडचे नाव आहे ‘राध्या’. राधा या नावापासून राध्या हे नाव प्रेरित आहे.

वाचा : रेखा बिग बींच्या नातीला भेटतात तेव्हा…

नुकताच बाबा झालेल्या भरतनेही त्याचा आनंद व्यक्त करत म्हटले की, आमच्या मुलीचे नाव राध्या तख्तानी ठेवले असल्याचे जाहीर करताना मला खूप आनंद होतोय. मी आणि ईशाने मिळून हे नाव ठरवले आहे. काही दिवसांनी तिचं बारसं करण्यात येईल.

हेमा मालिनी, धर्मेंद्र आणि तख्तानी कुटुंबाला राध्या हे नाव प्रचंड आवडले आहे. ‘ईशाला जर मुलगी झाली तर मला तिला भरतनाट्यम शिकवायला आवडेल’, असे हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हटले होते.