विनयभंग प्रकरणात ‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक स्वामी ओम यांना दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. स्वामी ओम आणि स्वामी संतोष आनंद यांच्यावर महिलेचा विनयभंग आणि तिला धमकावल्याचा आरोप आहे. विशेष न्यायाधीश संजय गर्ग यांनी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर स्वामी ओम यांना अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. या प्रकरणात संतोष आनंद यांना याआधीच उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

स्वामी ओम यांना या प्रकरणात फसवले जात आहे, असे स्वामींचे वकील एपी सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, त्यांना जामीन मंजूर केला तर ते मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणार नाही असे आश्वासनही त्यांनी न्यायालयाल दिले. ‘स्वामी ओम यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यापैकी एकही गुन्हा लैंगिक अत्याचाराअंतर्गत येत नाही. त्यामुळे ओम यांना जामीन मंजूर केला जात आहे,’ असे न्यायाधिशांनी म्हटले.

इंद्रप्रस्थ इस्टेट पोलीस ठाण्यात पीडित महिलेने स्वामी ओम आणि स्वामी संतोष आनंद यांच्याविरुद्ध गैरवर्तन आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या दोघांनी माझे कपडे फाडले होते, असेही पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले होते. पिडीतने सांगितले की, ती एका कामासाठी राजघाट परिसरात गेली होती. तेव्हा स्वामी आणि संतोष यांनी तिला अडवून तिच्यासोबत गैरवर्तन केले.