राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पण, माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांना मात्र, हा निर्णय पटला नसल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.

खेर यांची अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी चौहान यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला होता. पण, त्यांना बऱ्याच विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी अमुपम खेर यांनीही चौहान यांच्या नियुक्तीविषयी नाराजी व्यक्त केली होती. एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी चौहान अयोग्य असल्याचं मत मांडत या पदासाठी योग्य त्या पात्रतेच्या व्यक्तीची निवड व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या याच वक्तव्याला निशाणा करत चौहान यांनी अनुपम खेर यांना शुभेच्छा देत त्यांची नियुक्ती होण्याविषयी आपली प्रतिक्रिया दिली.

‘माझ्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेतच. कारण मी आयुष्यात बराच पुढे आलो आहे. ज्यावेळी एखाद्या पदावर तुमची नियुक्ती होते, त्यावेळी त्या पदासाठी इतर पर्यायही उपलब्ध असतातच. माझी निवडसुद्धा अशाच पर्यायांमधून करण्यात आली होती. अनेकांनी एफटीआयआयमधलं माझं काम पाहिलंच नाही. इथे एक उत्तम अभिनेता असण्यापेक्षा उत्तम प्रशासक असणं गरजेचं आहे, असं चौहान म्हणाले. हे वक्तव्य करून चौहान यांनी जुना हिशेब चुकता केल्याची चर्चा आहे.

वाचा : एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर अनुपम खेर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

‘ते फार अनुभवी आहेत. मुंबईत स्वत:ची अभिनय संस्था चालवण्याचा अनुभव असल्यामुळे इथला कारभार ते नीट हाताळतील. मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो आणि आशा करतो की, माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अपूर्ण राहिलेल्या कामांना ते मार्गी लावतील, असे त्यांनी म्हटले. मात्र, आपल्या कारकीर्दीत संस्थेने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले. कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार ‘एफटीआयआयमध्ये गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सर्वात चांगलं काम झालं होतं’, माझ्या कामाचं हेच प्रमाण असून, मी आणखी कसली अपेक्षा करु, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.