अनेकदा नवोदित कलाकारांना सिनेमा किंवा मालिका मिळाल्यावर आपले करिअर आता सुरू झाले असेच वाटते. सिनेमा आणि मालिका करुनच आपण पैसा, प्रसिद्धी मिळवू शकतो आणि ती टिकवू शकतो असं वाटत असतं. किंबहुना तशीच काहीशी स्वप्नही त्यांना पडत असतात. पण कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकवण्यासाठी करावा लागणारं तपही तेवढंच महत्त्वपूर्ण असतं. मालिका आणि सिनेमे याने प्रसिद्धी जरी मिळत असली तरी स्वतःला समृद्ध करण्यासाठी रंगभूमीची नाळ जोडलेली असणं फार गरजेचं आहे. रंगभूमीशी असलेल्या आपल्या याच नात्याविषयी आज कथा पडद्यामागचीमध्ये आपल्यासोबत संवाद साधणार आहे अभिनेता आस्ताद काळे…

नाटकांमध्ये रिटेक कधीच नसतात. तिकडे चुकांना वावच नसतो. पण म्हणून काही चुका होतच नाहीत, असे नाही. मात्र चुका झाल्यावर त्यातून कसे सावरायचे आणि पुढचे वाक्य, पुढचा प्रसंग कसा सांभाळून घ्यायचा याचे शिक्षण रंगभूमीवरच मिळते. पहिले काही प्रयोग हाऊसफुल्ल झाले म्हणून नंतरचे प्रयोग करायचे म्हणून करायचे असे चालत नाही. प्रत्येक प्रयोगाला येणारा प्रेक्षक वेगळा असतो. त्यामुळे पहिल्या प्रयोगावेळी तुमच्यात जी एनर्जी असते, तेवढीच एनर्जी तुम्हाला पुढच्या प्रत्येक प्रयोगावेळी द्यावी लागते. रंगभूमीवर तुम्ही दररोज नव्याने जगत असता. अभिनयात स्वतःचा पाया भक्कम करण्यासाठी रंगभूमी ही फार आवश्यक गोष्ट आहे.

नाटकांमध्ये आव्हानेही खूप असतात. एखाद्या विनोदी नाटकात कोणत्या जागी लोकं हसणार हे अनेकदा माहित असते आणि तसे ते हसतातही. पण काही वेळा त्याजागी लाफ्टर न येता अनपेक्षित ठिकाणी लाफ्टर मिळून जातो. यावरूनच प्रयोगाच्यावेळी किती सर्तक राहावे लागते ते कळते. कोणतेही वाक्य तुम्ही सहज घेऊ शकत नाही. टीव्हीवर मात्र असे काही नसते. तुम्ही वाक्य चुकलात तरी रिटेकवर रिटेक घेता येतात. शिवाय सिनेमांमध्येही काहीसे तसेच आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आपल्याला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कळतात.

पुण्यात प्रायोगिक रंगभूमी फार महत्त्वपूर्ण काम करते. दुर्दैवाने तसे काम मुंबईतील प्रायोगिक रंगभूमी करताना दिसत नाही. याला कारणेही वेगवेगळी आहेत. राधिका आपटे, अमेय वाघसारखे ताकदीचे कलाकार पुण्यातील प्रायोगिक रंगभूमीमुळे मिळाले. आता त्यांचा असा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. पण मुंबईमध्ये मात्र प्रायोगिक रंगभूमी मंदावलेली दिसते. सुरुवातीला कलाकारांना आविष्कारसारखे व्यासपीठ होते, पण आता तेही थंड पडल्याचे दिसून येते. दुसरीकडे मुंबईत इंग्रजी आणि हिंदी प्रायोगिक रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात; पण मराठीत मात्र फार  काही होत नाही.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com