सच्चा नाटककार कोण जो तीन तास लोकांना खुर्चीला खिळवून ठेवतो? पण जो नाटक रंगण्याआधीपासून सेट लावण्यासाठी धडपडत असतो लाइट्स बरोबर लागल्या की नाही हे पाहणाराही सच्चा नाटककार असू शकतो ना? फक्त त्यांच्या चेहऱ्याला ओळख नसते एवढंच पण मेहनतही ते तेवढीच करतात. संपूर्ण नाटक ज्याच्या खांद्यावर असतं असा नाटकाचा निर्माताही सच्चा नाटककार आहेच की… नेहमीच नवनवीन विषय घेऊन ते प्रेक्षकांचे मनोरंजन करायला येत असतात. आणि एक अभिनेताच निर्माताही असेल तर… हीच कलाकार मंडळी अनेकदा चाकोरी बाहेरचे विषयही मराठी रंगभूमीवर तेवढ्याच आत्मविश्वासाने घेऊन येतात. आज ‘कथा पडद्यामागची’मध्ये असंच एक नाव आपले रंगभूमीवरचे अनुभव सांगणार आहेत. हे नाव म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी.

रंगभूमी ही माझ्यासाठी जगणं समजून घेण्याचा सराव आहे. हे कितीही पुस्तकी वाटलं तरी रंगभूमीमुळे जगणं काय आहे ते फार खोलात जाऊन कळतं. एकंदरीत अंतर्मुख होण्याची, दुसऱ्यांच्या आत डोकावून पाहण्याची तसेच जगाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची रंगभूमी ही एक खिडकी आहे. त्या इतकं सत्याच्या जवळ नेणारं मला दुसरं काही अजूनपर्यंत मिळालेलं नाही.

एनएसडी, झुमरु टीम याकडून मी खूप काही शिकलो. जगभरात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगभूमी आहेत. काही मनोरंजनात्मक आहेत तर काही सामाजिक बांधिलकी निर्माण करणाऱ्याही रंगभूमी आहेत. झुमरु टीम ही म्युझिकल शोज करायची. एकावेळी १५० लोकं त्या शोमध्ये काम करत असताना जेव्हा तुम्ही केंद्रभागी असता तेव्हा तुम्हाला त्याचा प्रत्येक प्रयोग हा नवा वाटतो. सर्कस आर्टिस्ट ज्या कसरती करतात त्यापद्धतीच्या कसरती मी या शोमध्ये करायचो. माझी एण्ट्री आणि एक्झिट प्रेक्षकांमधून उडत असायची. मी त्या शोमध्ये असे काही नवनवीन प्रयोग केले जे कदाचित मला मराठी रंगभूमीवर करता येणार नाहीत. आमचा तो शो पाहण्यासाठी भारतातूनच नाही तर परदेशातूनही प्रेक्षक यायचे. रंगभूमीची आवड असणाऱ्यांनी आणि सतत काही तरी नवीन पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी एकदा गुडगावला जाऊन झुमरूचे शो पाहूनच यावे.

एक कलाकार म्हणून सतत वेगवेगळी नाटकं आणि सिनेमा पाहत राहणे फार आवश्यक आहे. त्याचबरोबर चांगलं वाचनही तेवढंच आवश्यक आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या मोबाइलमध्ये जगभरातील माहिती उपलब्ध असते. त्याचा सुयोग्य वापर केला गेला पाहिजे. मी अनेक भाषांमधील नाटकं आवर्जून पाहतो. सातत्याने असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या भाषा या शिकल्या पाहिजेत. याचं मुख्य कारण मला असं वाटतं की, जितक्या भाषांमध्ये तुम्ही विचार करता तेव्हा एका गोष्टीकडे पाहण्याचे दृष्टीकोन तुम्हाला लाभतात. रंगभूमीही अशीच आहे. प्रत्येक रंगभूमीही तुम्हाला जगण्याचा नवा दृष्टीकोन देते. मी जवळ जवळ एक वेगळी भाषा किंवा वेगळा नाट्य प्रकार बघितल्यासारखी नानाविध नाटकं पाहिले आहेत. काही नाटकं तर अक्षरशः हादरवून सोडणारी होती. यात प्रामुख्याने उल्लेख करावा असं केरळमध्ये कुडीयाट्टम हा एक कला प्रकार सादर केला जातो. यात फक्त संस्कृत नाटकं दाखवली जातात. हा कला प्रकार पाहून मी भारावून गेलो होतो. आजही मला ते क्षण डोळ्यासमोर येतात.

या सगळ्या गोष्टी या आवडीच्या आहेत. वेळ देऊन प्रयत्नपूर्वक करण्याच्या या गोष्टी आहेत. पण सध्याची स्थिती पाहता मुंबईसारख्या शहरात प्रायोगिक नाटक रद्दच झालंय आणि ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. अनेकांना प्रायोगिक नाटक करण्याची इच्छा असते पण तालमीची जागा, पुरेसा मोकळा वेळ या कोणत्याच गोष्टींची पूर्तता होत नाही. त्यात प्रायोगिक नाटक म्हटलं की त्यातून अर्थाजनही होत नाही. अशा परिस्थितीत जर तुमचं पोटपाणी यावर अवलंबून असेल तर गोष्टी अधिक अवघड होऊन जातात. पूर्वी १० ते ५ नोकरी करुन उरलेल्या वेळात नाटक करणं शक्य होतं. पण ते आता मोठ्या शहरात जवळजवळ अशक्य झालं आहे. त्यामुळे शासन आणि नाट्य परिषदांनी यावर अनेकदा बोलून झालंय पण त्यावर पाऊलं उचलण्याची वेळ आली आहे.

मी स्वतः गेले वर्षभर व्यावसायिक रंगभूमीचा एक निर्माता म्हणून काम करतोय. व्यावसायिक नाटकांची परिस्थिती तेवढी वाईट नाहीये. या नाटकांना तेवढी मोठी परंपरा आहे. पण प्रायोगिक नाटकांमध्ये काम करणारे अनेक नामवंत कलाकार आहेत ज्यांना थोडी शासनाच्या मदतीची गरज आहे. नाटक ही सर्वच वयोगटासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, हे आधी आपण मान्य केलं पाहिजे आणि त्याला कसं प्रोत्साहन देता येईल याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. शेवटी प्रेक्षकांनीही या सर्व गोष्टींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर ३०० रुपये असतील तर तुम्ही ते जंक फूड खाण्यात उडवणार की एखादं चांगलं नाटक पाहणार हे ठरवण्याची वेळ आहे. पण रंगभूमीचा हा इतिहासच राहिला आहे की, तिच्यासमोर जेवढी संकट आली त्या सर्व संकटांवर मात करत ती आजही ताठ मानेने उभी आहे.

कलाकारांच्या आयुष्यात कधीही न विसरु असे अनेक क्षण येतात. माझ्याही आयुष्यात असे अनेक क्षण आले पण त्यातही एक क्षण आहे जो मी कधीही विसरु शकत नाही. शो मस्ट गो ऑन हे थिएटरचं वाक्य किती खरं आहे याचा प्रत्यय तिथे काम करणाऱ्या प्रत्येकालाच येतो. काही वर्षांपूर्वी माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली. मी झुमरुच्या शोसाठी बाहेर होतो तेव्हा ग्रीन रूममधून विंगेत जाताना माझे बाबा व्हेंटिलेटरवर असल्याचा मला फोन आला. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. माझ्या वडिलांनी नाटक करण्यासाठी नेहमीच मला प्रोत्साहन दिलं. विंगेत उभा असताना मी मनात म्हटलं की, हा प्रयोग तुमच्यासाठी आणि मी सरळ स्टेजवर गेलो. जसा पडदा उघडला तेव्हा कळलं की शो हाऊसफुल्ल आहे. झुमरुचे शो कधी हाऊसफुल्ल होत नाहीत पण त्यादिवशी एकही लाल खुर्ची दिसत नव्हती. ते पाहून मला फार आश्चर्य वाटलं. मनात दुःख असूनही चेहऱ्यावर हसू आणतो तो प्रयोग तुम्हाला करायचा असतो, ती भूमिका तुम्हाला चोख वठवावीच लागते. तो दिवस मी आजही विसरू शकत नाही. नाटक हा एक असा व्यवहार असतो की, तिथे स्वतःच्या दुःखापेक्षा किंवा स्वतःच्या आनंदापेक्षा समोरच्या माणसाचा आनंद पाहायला लावतं. त्यावेळी मला माझं दुःख विसरुन, तिकीट काढून आलेल्या त्या ८०० लोकांचं मनोरंजन करणं अधिक महत्त्वाचं होतं. त्यामुळेच मला असं वाटतं की, जगतानाही जर आपण आपल्या सुख दुःखापेक्षा आपण दुसऱ्यांच्या सुख दुःखाचा आधी विचार केला तर माणूस म्हणून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@indianexpress.com