अनेकदा नवोदित कलाकारांना सिनेमा किंवा मालिका मिळाल्यावर आपले करिअर आता सुरू झाले असेच वाटते. सिनेमा आणि मालिका करुनच आपण पैसा, प्रसिद्धी मिळवू शकतो आणि ती टिकवू शकतो असं वाटत असतं. किंबहुना तशीच काहीशी स्वप्नही त्यांना पडत असतात. पण कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकवण्यासाठी करावा लागणारं तपही तेवढंच महत्त्वपूर्ण असतं. त्या साधनेचं महत्त्व ती करताना जाणवत नसलं तरी पुढील आयुष्यासाठी ते फार महत्त्वपूर्ण असतं. रंगभूमीचंही काहीसं तसंच आहे. रंगभूमी एक साधना आहे आणि साधना ही नेहमीच एका तपाप्रमाणे आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे अगदी खरं आहे. याच साधनेविषयी आज कथा पडद्यामागचीमध्ये आपल्यासोबत संवाद साधणार आहेत अभिनेत्री किशोरी शहाणे- विज…

इमारत कितीही उंच असली, सुंदर दिसत असली तरी त्या इमारतीचा पाया जर भक्कम नसेल तर ती इमारत जास्त काळ तग धरू शकत नाही. हेच कलाकारांच्याबाबतीतही उघड सत्य आहे. जर अभिनयाचा पायाच भक्कम नसेल तर त्यात नेहमीच आत्मविश्वासाची कमतरता जाणवत राहणार. पण त्याच तुलनेत रंगभूमीवर बऱ्यापैकी काम करुन आलेल्या मुलातील आत्मविश्वास त्याच्याशी बोलताना पटकन जाणवेल. त्यामुळे कोणत्याही कलाकाराने आपल्या करिअरची सुरूवात थिएटरनेच करावी असे मला वाटते. त्या प्रवासात तुम्ही जे शिकत जाता ते तुम्हाला पुढील वाटचालीसाठी फार उपयुक्त ठरतं.

मला आजही नाटकात काम केल्याचा फायदा माझ्या प्रत्येक कामात होतो. पण काही वर्षांपूर्वी मी नाटकात काम करण्याचे थांबवले याचे मुख्य कारण म्हणजे सिनेमे आणि मालिकांचे चित्रीकरण. नोकरदार वर्गातील महिला असल्यामुळे आपल्यावर खूप जबाबदाऱ्या असतात. अभिनेत्री असणं हेच एक मुळात २४ तासांचे काम आहे. सिनेमा आणि मालिका हे एकीकडे आणि नाटक एकीकडे एवढा फरक या प्रकारात आहे. नाटकासाठी, त्याच्या दौऱ्यांसाठी वेळ काढावाच लागतो आणि समरसून त्यात काम करावं लागतं. प्रत्येक प्रयोग, प्रत्येक नाटक वेगळं असतं. एका प्रयोगाच्या पुण्याईवर दुसऱ्या प्रयोगात जगता येत नाही. प्रत्येक प्रयोग, तिकडचा प्रेक्षक सगळं काही वेगळं असतं. मला या काळात सिनेमे, मालिका यांमधून वेळ मिळत नाही. त्यामुळेच मी सध्या कोणतंही नाटक हाती घेत नाही.

‘दुर्गा झाली गौरी’ या नृत्य नाटिकेतून माझा रंगभूमीशी संबंध आला. त्यानंतर ‘मोरुची मावशी’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘मी तुझ्या पाठीशी आहे’, ‘लंडनची सून इंडियात हनीमून’ अशा अनेक नाटकांमध्ये मी काम केले. फक्त मराठीच नाही तर हिंदीतील ‘आधे अधुरे’ या नाटकात काम केले. हे नाटक तेव्हा फार गाजलं होतं. तो नाटकांचा काळ तेव्हाच्या तालमी या सगळ्याच गोष्टी अविस्मरणीय आहेत. तुम्ही नाटकांमध्ये काम करता त्या आठवणी तर तुमच्यासोबत असतातच पण सहकलाकारांसोबतची मजा- मस्तीही तुमच्या आयुष्याची एक शिदोरी होऊन जाते. अशाच आठवणींनी माझं हे शिदोरीचं गाठोडं भरलेलं आहे.

शब्दांकन- मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com