बॉलिवूडमधील निर्माता करण जोहरने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्वीकारल्यानंतर बुधवारी जुळ्या मुलांना रुग्णालयातून घरी आणले. अंधेरीतील मसरानी रुग्णालयात करण जोहरच्या दोन जुळ्या मुलांचा ७ फेब्रुवारीला जन्म झाला. मुलांच्या जन्मानंतर जवळ जवळ एका महिन्याने करणने एकल पालकत्व स्वीकारल्याचे सांगितले होते. त्याच्या मुलांची नावे रुही आणि यश अशी आहेत. या मुलांचा जन्म हा वेळेपूर्वी झाला असल्यामुळे त्याच्या मुलांना आतापर्यंत रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. आता करणने त्यांना घरी आणले आहे.

karan-joahr-baby
छाया सौजन्य-वरिंदर चावला

करणच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी मंगळवारी आलिया भट्ट, शाहरुख खान, रणबीर कपूर यांनी रुग्णालयात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते. करण जोहरच्या मुलांची आतापर्यंत चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता घरी नेल्यानंतर करणच्या मुलांना पाहण्यासाठी बॉलिवूड कलाकार मंडळींची गर्दी दिसण्याची शक्यता आहे. त्यासोबतच करण आपल्या हृदयाचे दोन तुकडे असलेल्या यश आणि रुही यांचे फोटो कधी प्रसिद्ध करतो, याचीही त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असेल. करण जोहर नेहमीच अनेक कारणांनी चर्चेत असतो. त्याने ‘अॅन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रातून मूल दत्तक घेण्याची किंवा सरोगसीच्या माध्यमातून वडील होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

karan-kids
छाया सौजन्य-वरिंदर चावला

करण जोहरच्या जुळ्या मुलांचा ज्या रुग्णालयात जन्म झाला त्याच रुग्णालयात अभिनेता शाहरुख खानचा तिसरा मुलगा अब्रामचा जन्म झाला होता. २०१३ मध्ये शाहरुखला तिसऱ्या अपत्याची प्राप्ती झाली होती.

karan-johar-kids-820-1
छाया सौजन्य-वरिंदर चावला