बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेक मंडळींचा सध्या मराठी चित्रपटांतील सहभाग वाढताना दिसत आहे. मग ती छोटीशी भूमिका असो वा निर्मिती-दिग्दर्शन असो. सध्या आणखी एक नाव मराठी चित्रपटसृष्टीशी जोडले गेले आहे ते ‘ह्रदयांतर’ या चित्रपटाच्या निमित्ताने. विक्रम फडणीस हे प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून ख्यातनाम आहेतच पण आता ‘ह्रदयांतर’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने ते प्रथमच निर्माता-दिग्दर्शक म्हणून  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आणि त्यांच्या याच चित्रपटासाठी म्हणून हिंदीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका, दिग्दर्शक फराह खान मराठी चित्रपटासाठी पुन्हा एकदा नृत्यदिग्दर्शन करणार आहेत.

‘मी अनेक भाषांमध्ये काम केल्यामुळे मराठी गाण्यावर नृत्य बसवणं माझ्यासाठी तितकंसं कठीण नव्हतं. याआधी मी ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटासाठी ‘छम छम करता’ हे गाणं केलं होतं. गेली काही वर्षे मराठी चित्रपटसृष्टी मोठय़ा प्रमाणावर प्रगती करते आहे. त्यामुळे मला इथे काम करून अतिशय आनंद झाला आहे’, असे फराह खान यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पहिल्यांदाच दिग्दर्शनाबद्दल बोलताना विक्रम फडणीस म्हणाले की, ‘गेली २५ वर्षे मी फॅशन डिझाईन करतोय आणि गेल्या सात वर्षांपासून माझं चित्रपट बनवायचं स्वप्न आता प्रत्यक्ष रूपात येतंय. त्यामुळे मी चांगल्याप्रकारे अनुभवतोय या सर्व गोष्टी. शिवाय मला अनेक लोकांची मदत या निमित्ताने होत आहे. मुक्ता आणि सुबोधने या चित्रपटासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. या चित्रपटाचं श्रेय हे माझ्या एकटय़ाचं नसून यामध्ये समावेश असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आहे आणि यापुढेही दिग्दर्शक म्हणून काम करायला मला आवडेल.’

चित्रपटात मुक्त बर्वे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाबद्दल गप्पा मारताना मुक्ता बर्वे म्हणाली, ‘हृदयांतर’ माझ्यासाठी सुखद धक्का ठरला. विक्रम म्हणजे डिझायनर त्यामुळे हा चित्रपट खूप छान दिसेल हा विश्वास होता. पण त्यांनी जेव्हा मला पटकथा ऐकवली तेव्हा त्या गोष्टीचं सार, त्यातली भावना या आतून जाणवल्या आहेत, असं वाटलं होतं. त्याने उत्तम प्रकारे दिग्दर्शन केलं आहे. मी अनेक नवीन दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे पण विक्रमबरोबर काम करताना मला कुठेही नवखेपणा जाणवला नाही. किंवा मनात कुठलीही शंका वाटली नाही. एखाद्याकडून चांगल्याप्रकारे काम काढून घेण्याची कला त्याच्यामध्ये आहे’, असं तिने यावेळी बोलताना सांगितलं. याशिवाय चित्रपटातील गाण्यांचं दिग्दर्शन शामक दावर, फराह खान या बॉलीवूडमधील ख्यातनाम व्यक्तींनी केलं आहे.